देवगड,दि.०८ ऑगस्ट
देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचालित डॉ. वामन कृष्णाजी आपटे बहुविध कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यात विविध कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेले आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी कॉज टू कनेक्ट ,पुणे या संस्थेचे संस्थापक अनिरुद्ध बनसोड,भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान झाराप या संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, देवगड ऐज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार , खजिनदार प्रदीप आंबेरकर, स्थानिय समिती माजी उपाध्यक्ष डॉ. प्रमोद आपटे, सौ. स्वाती आपटे , माजी आमदार ॲड. अजित गोगटे ,स्थानिय समिती सचिव ॲड. अविनाश माणगावकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समितीचे पदाधिकारी व सदस्य, प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर आदि मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व मान्यवरांचे लेझीम पथकाने व पुष्पृष्टीने उत्स्फूर्त स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर डॉ. वामन कृष्णाजी आपटे बहुविधकौशल्य विकास उपक्रम नामफलकाचे अनावरण व बहुविध कौशल्य अभ्यासक्रम वर्गांचे उद्घाटन डॉ. प्रमोद आपटे याच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अविनाश माणगावकर यांनी केले .
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कौशल्य गीताने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
उद्घाटक मा. डॉ. प्रमोद आपटे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी श्री. अनिरुद्ध बनसोड मनोगत व्यक्त करताना म्हणाले बहुविध कौशल्य विकास उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या काळात केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. आज या वर्गाचा झालेला शुभारंभ सोहळा खूपच छान पद्धतीने या शाळेने केला. आतापर्यंत ८१ शाळांमध्ये असा शुभारंभ सोहळा आम्ही पाहिलेला नव्हता असे गौरवोद्गार यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. श्री. प्रसाद देवधर यांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून पाककला, अभियांत्रिकी कौशल्य , उर्जा पर्यावरण, अन्नप्रक्रिया ,कृषी , तंत्रज्ञान, शेती, व्यवसाय, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता यांसारख्या विविध क्षेत्रांची ओळख होईल. स्वतःच्या आवडीचे कौशल्य शिकून त्याचा उपयोग भविष्यात रोजगार व स्वयंरोजगारासाठी करता येतो, असे सांगितले. शाळेने आयोजित केलेला शुभारंभ सोहळा हा खूपच सुंदर आणि अनोख्या पद्धतीने केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रतिज्ञा घेतली. अध्यक्षीय मनोगतात सदानंद पवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले . तसेच या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा ,असे सांगितले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर कर्णिक यांनी केले . तर शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांनी आभार मानले . संगीत शिक्षक प्रसाद शेवडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाला चालना मिळणार आहे.