गोकुळवरील विजय ही महाराष्ट्रातील आगामी राजकीय विजयांची नांदी; किरण टेंबुलकर आणि गणेश गावकर यांचा विश्वास
देवगड,दि.१९ ऑक्टोंबर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या विजयाचा आनंद जामसंडे येथे फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करत साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा जल्लोष केला.
गोकुळ दूध संघ ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सहकारी संस्था असून, या संस्थेवरील विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेते बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय जनतेच्या बदलत्या मानसिकतेचा संकेत असल्याचे मत युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी व्यक्त केले.
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची मोठी ताकद असतानाही महाविकास आघाडीने विजय मिळवला. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमानी बाणा दाखवत महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. या निकालातून जनता आता बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत असून, या विजयाचा आगामी काळात महाविकास आघाडीला राजकीय फायदा होईल, असा विश्वास टेंबुलकर यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि दुग्धव्यवसायाला लाभ मिळावा, यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही टेंबुलकर यांनी सांगितले.
दरम्यान, गोकुळ दूध संघावरील विजय ही केवळ सुरुवात असून, या विजयाचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी व्यक्त केला.
नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली ही आनंदाची बातमी असून, हा विजय आगामी राजकीय विजयांची नांदी ठरेल, असेही गावकर यांनी सांगितले.
जामसंडे येथे जल्लोषात सहभाग

गोकुळ दूध संघावरील विजयाच्या पार्श्वभूमीवर जामसंडे बाजारपेठ येथे फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी युवक काँग्रेस, युवासेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सूरज घाडी, नगरसेवक तेजस मामघाडी, दीपक पाडावे, तुषार भाबल, सज्जाद्दीन सोलकर, अमित तोडणकर, विनायक म्हापसेकर, शेखर धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.