इंद्रधनू देवगडच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ; सिद्धेश जाधव आणि तृप्ती कुडाळकर यांच्या सुरांनी रंगणार ‘दांडिया नाईट’!
देवगड,दि.११ ऑक्टोबर
नवरात्रीचा उत्साह, दांडियाचा ठेका आणि रंगीबेरंगी रोषणाईने देवगडचे वातावरण आजपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होणार आहे. इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित नवरात्र उत्सव २०२६ ला आज, ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून, २० ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव रंगणार आहे. कॉलेज रोडनजीकच्या पाटणकर कंपाऊंडमध्ये (सारस्वत बँकेसमोर) दररोज रात्री ९.३० वाजता दांडियाचा जल्लोष अनुभवता येणार आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवादरम्यान सहभागी होणाऱ्या निवडक कलाकारांना संस्थेच्या वतीने दररोज विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. यामध्ये लक्षवेधी चेहरा, बेस्ट स्माईल, बेस्ट कॉस्च्युम, इंद्रधनू इन्स्टा क्वीन, इंद्रधनू इन्स्टा किंग, किंग ऑफ दांडिया नाईट आणि क्वीन ऑफ दांडिया नाईट यांसह एकूण १२ पुरस्कारांचा समावेश आहे.

या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेली ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी’ ही संगीत मैफल. यामध्ये ‘भारत का अमृत कलश’ विजेता आणि ‘होऊ दे धिंगाणा’ फेम सुप्रसिद्ध गायक सिद्धेश जाधव, तसेच ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम गायिका तृप्ती कुडाळकर आपल्या सुरांनी रसिकांची मने जिंकणार आहेत.
दरम्यान, सध्या निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचा संदेश देण्याचा संकल्पही इंद्रधनू संस्थेने केला आहे. ‘उत्सव साधेपणाचा, संकल्प जलसंवर्धनाचा’ या संकल्पनेतून यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी दिली.
त्यामुळे पुढील नऊ दिवस देवगडमध्ये दांडियाचा उत्साह रंगणार असून, २० ऑक्टोबरच्या सेलिब्रिटी दांडिया नाईटकडेही रसिकांचे लक्ष लागले आहे.