खोटे गुन्हे मागे घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; चार तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन!
देवगड,दि.०३ नोव्हेंबर
मिठमुंबरी बागवाडी जेटीवरील घटनेप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देऊनही पोलिसांकडून संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याच्या निषेधार्थ मिठमुंबरी बागवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी देवगड पोलीस ठाण्यासमोर ङ्कजेलभरोङ्ख आंदोलन छेडले. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास देवगड एसटी स्थानकासमोरील बालोद्यान येथून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी शासन व पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ङ्कआमच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्हाला अटक कराङ्ख, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. सुमारे चार तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते.
या आंदोलनात माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मच्छिमार नेते चंद्रशेखर उपरकर, मच्छिमार नेत्या स्नेहा केरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, तालुका महिला संघटक हर्षा ठाकूर, ठाकरे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्यासह बागवाडी येथील मच्छिमार राजाराम आडकर, रमेश तारी, उमेश तारी, सुकन्या कोयंडे, लक्ष्मण तारी, विकास कोयंडे, धनंजय जोशी, तारामुंबरी मच्छिमारी संस्थेचे चेअरमन विनायक प्रभू, आप्पा नेसवणकर, अंजली आडकर आदींसह ग्रामस्थ व मच्छिमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले व संजय कातिवले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, तक्रारीची पोलीस स्टेशन डायरीत नोंद झाल्याशिवाय हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. बागवाडीतील महिलांना प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, वैभव नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला बोगस पालकमंत्री मिळाले असून, भाजपच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा नियोजन निधीत ३० टक्के कपात झाली असून, ती ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शासनाकडे ठेकेदारांची ९८ हजार कोटी रुपयांची देणी थकीत असताना विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजने सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले, तरी शासनाकडे पैसे नसल्याचा दावा त्यांनी केला. विकासकामांमध्ये टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप करीत मिठमुंबरी बागवाडी ग्रामस्थांवरील अन्यायाविरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांमार्फत अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली एकतर्फी गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप करून गरज पडल्यास पोलीस महासंचालकांची भेट घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार वैभव नाईक यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मिठमुंबरी बागवाडीतील ग्रामस्थ हे भाजपचेच कार्यकर्ते असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्तेच्या जोरावर सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या प्रकल्पांना विरोध राहील. यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्पासारख्या प्रकल्पांविरोधात शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी उभी राहिली होती. यापुढेही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तडजोड केली जाणार नाही. सत्तेच्या मस्तीत राहू नका, दहा वर्षांपूर्वी जसे सत्तापरिवर्तन झाले, तसे पुन्हा होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. तसेच दोन्ही बाजूंच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री याच भागाचे आमदार असतानाही पारंपरिक मच्छिमारांना आंदोलन करावे लागणे ही शोकांतिका आहे. ग्रामस्थांना भडकावण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विनंतीवरून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत. यापूर्वी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेल्यांना ग्रामस्थांनी दोन वेळा माघारी पाठविले होते. त्यावेळी आम्ही आंदोलनात नव्हतो. ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरच त्यांच्या विनंतीवरून आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मिठमुंबरी खाडीतील खेकडे, कोळंबी व अन्य माशांच्या मत्स्यबीज निर्मितीवर कायाकिंग प्रकल्पाचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे खासगी प्रकल्पासाठी मच्छिमारांच्या जेटीचाच अट्टाहास का, असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्र्यांनी मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेली जेटी तातडीने खुली करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी गणेश गावकर, लक्ष्मण तारी, चंद्रशेखर उपरकर, किरण टेंबुलकर, स्नेहा केरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, चार तासांहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी राजेश भागवत यांच्याशी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. ग्रामस्थांच्या तक्रार अर्जाची योग्य ती चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन भागवत यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.




