Devgad news: ओरोस-देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश

शेअर करा

पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नवा मार्ग ; दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना

देवगड,दि.२१ ऑक्टोंबर

देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी (ओरोस)शी थेट जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी या रस्त्याला प्रमुख राज्य मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात समावेश करण्याची संकल्पना मांडली होती.त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या रस्ते विकास आराखड्यात हा मार्ग नकाशावर प्रस्तावित करण्यात आला आहे.

देवगड ते ओरोस नांदगाव मार्गे प्रवास केला तर सध्याचा मार्ग हा ८६ किलोमीटरचा वळणावळणाचा रस्ता आहे. यासाठी किमान दोन तास वेळ लागत होता. आता नवा मार्ग ५४ किलोमीटरचा असणार आहे. ओरोस मुख्यालय येथे एका तासात पोचता येणार आहे. देवगड ते जिल्हा मुख्यालयादरम्यान थेट, सरळ आणि कमी अंतराचा रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी अधिक अंतर कापावे लागत होते.

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ते रानबांबुळी, पडवे, हेदुळ, खोटले, पोईप, चुनावरे, आडवली, घाडीवाडी, पळसंब, गावठण, कुडोपी, पोयरे, नारिंग्रे, दहीबाव, इळये, कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरीमार्गे देवगड असा रस्ता प्रमुख राज्य मार्ग म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. या मार्गाचा रस्ते विकास आराखड्यामध्ये समावेश करण्याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पत्र दिले होते.त्यानुसार रस्ते विकास आराखड्यात सामावेश झाला आहे.

शेअर करा