उपस्थिती अपुरी असल्याची हरकत घेतल्याने कार्यक्रम रद्द; आठ दिवसांनी नव्याने आरक्षण सोडत घेण्याची तहसीलदार शीतल जाधव यांची माहिती.
देवगड,दि.१७ जुलै
देवगड तहसिल कार्यालयात आयोजित केलेल्या सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता मात्र यावेळी शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची पुरेसी उपस्थिती नसल्याबाबत हरकत घेतल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला व आठ दिवसांनी 24 जुलै रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार शीतल जाधव यांनी दिली.
महाराष्ट— शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे याबाबत काढलेल्या शुध्दीपत्रकानुसार, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये सरपंच आरक्षणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील 1 पद कमी करून ते खुल्या प्रवर्गामध्ये 1 पद वाढविण्यात आले आहे.सदर आरक्षणातील बदल हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ज्या तालुक्याची सरपंचपदाची संख्या जास्त आहे त्या तालुक्यात अनुषंगिक बदल करण्यात यावा असे नमुद करण्यात आले.सदर सुचनेनुसार देवगड तालुक्यातील सरपंच पदाची संख्या(एकूण 72) असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या पत्रानुसार शुक्रवार दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तहसिलदार शीतल जाधव यांच्या उपस्थितीत नामाप्र प्रवर्गातील 1 पद कमी करून खुल्या प्रवर्गातील 1 पद वाढविण्यासाठी नामाप्र वर्गातील प्रवर्गासाठी आरक्षित 10 ग्रामपंचायतीमध्ये सोडत पध्दतीने चिठ्ठी काढून खुल्या प्रवर्गातील आरक्षित प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी नामाप्र प्रवर्गातील सरपंच उपस्थित नसल्याची हरकत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी घेतली.यामुळे ही आरक्षण सोडत पुढे घेण्यात यावी अशी मागणी केली.तसेच संबंधित सरपंचांना आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे अशी मागणी साळसकर यांनी केली.यामुळे शुक्रवारी आयोजित केलेली आरक्षण सोडत रद्द करून हा कार्यक्रम आठ दिवसांनी 24 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार शीतल जाधव यांनी दिली.
आरक्षण सोडत कार्यक्रमाला तहसिलदार शीतल जाधव, नायब तहसिलदार व्ही.व्ही.शेठ, एस्.एस्.खरात, श्रीमती सी.एस्.आखाडे, सहाय्यक महसुल अधिकारी एस्.डी.कोयंडे, महसुल सहाय्यक प्रदीप कदम, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, सजाउद्दीन सोलकर, दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, केतन खाडये, अशोक जाधव आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील नामाप्र प्रवर्गातील बुरंबावडे, उंडील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, दाभोळे, विजयदूर्ग, कातवण, कट्टा व शिरगाव या दहा ग्रामपंचायतीमधून सोडतीने चिठ्ठी काढून येणारी जागा ही खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी आरक्षित करण्यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.