देवगड: “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने”अंतर्गत गिर्ये ग्रामपंचायतीत विशेष जनजागृती शिबिर संपन्न

शेअर करा

देवगड,दि.१४ ऑगस्ट

मा. नितेश राणे, मंत्री (मत्स्यव्यवसाय व बंदरे) तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी गिर्ये ग्रामपंचायत येथे विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गिर्ये बांदेवाडी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था व परवाना अधिकारी मत्स्यव्यवसाय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडले.
शिबिराचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन परवाना अधिकारी देवगड श्री. किरण वाघमारे यांनी केले. त्यांनी उपस्थित मच्छिमार बांधवांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, GAIS नोंदणी, NFDP नोंदणी तसेच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) अंतर्गत उपलब्ध योजनांबाबत सविस्तर व समर्पक माहिती दिली. या योजनांचा लाभ कसा मिळवायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबिर सकाळी ठीक १० वाजता सुरू होऊन दुपारी ३:३० वाजेपर्यंत चालले. या कालावधीत एकूण १०० पेक्षा अधिक मच्छिमार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. शिबिरादरम्यान मच्छिमारांचे GAIS अर्ज भरण्यात आले. तसेच मच्छिमारांची NFDP नोंदणी करण्यात आली आणि त्याचवेळी NFDP प्रमाणपत्रे डाउनलोड करून तत्काळ वितरित करण्यात आली. याशिवाय KCC व DPDC योजनांची सविस्तर माहिती देण्यात येऊन संबंधित अर्ज प्रक्रियाही स्पष्ट करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गिर्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती गिरकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी सर्व मच्छिमार बांधवांना मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि योजनांचा पूर्ण उपयोग करून घेण्याचे आग्रह धरला. गिर्ये बांदेवाडी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. डोळकर यांनी जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांना संस्थेचे सदस्यत्व देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेकडून सतत प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
मत्स्यव्यवसाय विभागाचे सागरमित्र सारा गांवकर, समिक्षा बांदकर व स्वप्नील कुवेसकर यांनी मच्छिमार बंधू-भगिनींच्या फॉर्म भरण्याचे काम कौशल्याने व तत्परतेने पूर्ण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कर्मचारी तसेच गिर्ये बांदेवाडी संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या जनजागृती शिबिरामुळे मच्छिमार बांधवांना योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण मदत झाली.

मा. मंत्री मत्स्यव्यवसाय नितेश राणे यांनी, असे जनजागृती शिबिर नियमितपणे आयोजित करण्या बाबत सूचना दिल्याचे अधिकारी यांनी सांगितले. तर सर्व मच्छिमार व मासेमारीशी निगडित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांनी स्पष्ट केले.

शेअर करा