निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञान, प्रेरणा आणि संस्कारांचा अनोखा संगम
देवगड,दि.२७ ऑगस्ट
निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीक्षित फाउंडेशन, देवगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अंतिम सोहळा मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील संगणक कक्षाच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
ज्ञान, जिज्ञासा, वाचनसंस्कृती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ७०४ विद्यार्थ्यांमधून शालेय स्तरावर निवड झालेले प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत शिक्षक व पालक प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत मोंड हायस्कूलची सृष्टी मंगेश नाईकधुरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. किंजवडे हायस्कूलची वैदही प्रताप मांडवकर हिने द्वितीय क्रमांक, तर सौंदाळे हायस्कूलचा दूर्वास प्रकाश राणे याने तृतीय क्रमांक मिळविला. पडेल हायस्कूलची शमिका जयवंत माळगवे हिने उत्तेजनार्थ प्रथम, तर मोंड हायस्कूलची अक्षरा राजेश अनभवणे हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमास देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष निरंजन दीक्षित, लोकल कौन्सिलचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समितीचे सदस्य विलास रूमडे, स्थानीय समितीचे खजिनदार द.म. जोशी, देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार ,मुख्याध्यापक प्रविण खडपकर तसेच आत्मचरित्राचे अभिवाचन करणाऱ्या आज्ञा कोयंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ७८ विद्यार्थ्यांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातून गुणवत्तेच्या आधारे १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या १५ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ऋत्विक धुरी यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने तोंडी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विविध फेऱ्या, उत्सुकता वाढविणारी प्रश्नरचना आणि आकर्षक सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे “मी आलो… मी शिकलो… मी प्रेरित झालो…” या संकल्पनेवर उभारण्यात आलेला सुंदर फोटो कॉर्नर. दीक्षित फाउंडेशनने देवगड तालुक्यात केलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्याचे छायाचित्रांच्या माध्यमातून प्रभावी दर्शन या फोटो कॉर्नरमध्ये घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे “निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या चरित्रातून आम्ही काय शिकलो?” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला ‘थॉट पॉईंट’ हा कार्यक्रमाचा आणखी एक प्रेरणादायी भाग ठरला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून केवळ एका व्यक्तिमत्त्वाची माहिती घेतली नाही, तर त्यांच्या विचारांतून जीवनमूल्ये, कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी, शिक्षणाची महती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आत्मसात केली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अल्पोपहाराचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि सादरीकरण अत्यंत शिस्तबद्ध, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले.
“विद्यार्थ्यांच्या हातात केवळ बक्षीस नव्हे, तर प्रेरणेची मशाल द्यायची आहे,” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम देवगड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक वेगळा आदर्श ठरला. बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून घडले.
यावेळी निरंजन दीक्षित यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी उज्ज्वल यश आणि प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आज मिळविलेल्या यशाचा उपयोग पुढील आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी करावा, अशी प्रेरणादायी भावना त्यांनी व्यक्त केली.
देवगड तालुक्यात प्रथमच अशा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ज्ञानाला स्पर्धेची जोड, स्पर्धेला प्रेरणेची साथ आणि प्रेरणेला संस्कारांची दिशा देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सहाय्यक शिक्षिका आफरीन पठाण यांचे होते. या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षक सुरेश पवार तसेच सहाय्यक शिक्षिका रश्मी ठाकूर यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम सहकार्य लाभले.