Devgad : देवगड-जामसंडेतील स्ट्रीटलाईट बंद नव्हे, स्मार्ट मीटरच्या टेस्टिंगमुळे विलंब!

शेअर करा

शहरातील पथदिवे सुरळीत सुरू मुख्याधिकारी हरिदत्त माने यांचे स्पष्टीकरण

देवगड,दि.०८ऑक्टोंबर

देवगड-जामसंडे शहरातील स्ट्रीटलाईट सुरू होण्यास झालेल्या विलंबाबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महावितरणच्या स्मार्ट मीटर यंत्रणेच्या टेस्टिंग आणि प्रोग्रामिंग प्रक्रियेमुळे पथदिव्यांचा विद्युत पुरवठा नेहमीपेक्षा काहीसा उशिराने सुरू झाला. नगरपंचायतीकडून महावितरणचे कोणतेही वीजबिल थकीत नसून, सर्व बिलांचा वेळेत भरणा करण्यात आल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

देवगड शहरातील रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. या स्मार्ट मीटरमध्ये ठराविक वेळेनुसार विद्युत पुरवठा सुरू आणि बंद करण्यासाठी प्रोग्रामिंग करण्यात येत आहे. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता पथदिवे सुरू होऊन सकाळी ७ वाजता बंद होतील, अशी स्वयंचलित व्यवस्था या यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे.

या प्रणालीची टेस्टिंग गुरुवारी देवगड शहरात महावितरणकडून करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने पथदिवे सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. त्यामुळे शहरातील स्ट्रीटलाईट बंद असल्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, देवगड-जामसंडे नगरपंचायतीने महावितरणचे वीजबिल थकविल्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची चर्चा चुकीची असल्याचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतीने वीजबिलांचा वेळेत भरणा केला असून, स्मार्ट मीटरच्या टेस्टिंगमुळेच पथदिवे सुरू होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या देवगड शहरातील स्ट्रीटलाईट सुरळीत सुरू असून, शहर पुन्हा प्रकाशमान झाले आहे, अशी माहितीही मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी दिली.

शेअर करा