देवगड : अणुऊर्जा प्रकल्पावरून सुशांत नाईकांचा हल्लाबोल; सरकारने भूमिका स्पष्ट करावी

शेअर करा

खासदार आणि पालकमंत्र्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे जनतेत संभ्रम; आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनालाही शिवसेनेचा पाठिंबा

देवगड,दि.२७ जून

सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. देवगड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

नाईक म्हणाले की, एका बाजूला खासदार नारायण राणे अणुऊर्जा प्रकल्पाला समर्थन देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री नितेश राणे प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत. एकाच कुटुंबातील दोन जबाबदार लोकप्रतिनिधींच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने अणुऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार केल्याचा दावा करत त्यांनी त्यासंदर्भातील कागदपत्रे व छायाचित्रे पत्रकार परिषदेत सादर केली.

देवगड तालुक्यातील काही भागांमध्ये यापूर्वी भू-सर्वेक्षणाचे काम सुरू होते. कोणत्याही मोठ्या प्रकल्पापूर्वी सर्वेक्षण केले जाते. असे असताना पालकमंत्री प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगत असल्याने जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आजगाव परिसरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा विरोध वाढल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेचा विरोध पाहून भूमिका बदलण्याचे राजकारण सुरू असल्याची टीका करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाण्याचे धाडस पालकमंत्र्यांमध्ये नसल्याचे म्हटले.

जिल्ह्यातील सर्व अधिकार एका कुटुंबाकडे केंद्रीत झाल्याने मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत, अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोकणातील पर्यावरणाला धोका निर्माण करणारे प्रकल्प नकोत, तर आंबा, काजू आणि स्थानिक रोजगाराला चालना देणारे उद्योग उभारावेत, अशी मागणीही त्यांनी केली. हापूस आंबा, काजू प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्रे आणि शेतकरी हिताचे प्रकल्प उभारण्यावर सरकारने भर द्यावा, असे ते म्हणाले.

यावेळी आंबा बागायतदारांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. नुकसानभरपाईसाठी झालेल्या आंदोलनामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असे सांगत ३ जुलै रोजी होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी केली.

पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, दादा सावंत, तुषार धुरी, गुरुदास धुवाळी, विकास कोयंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा