Devgad : किंजवडेत दुष्काळावर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी

शेअर करा

सिव्हिल इंजिनियर लक्ष्मण श्रीमंतसुळ यांचा पुढाकार; ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

देवगड,दि.०४ ऑक्टोंबर

देवगड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळावर मात करण्यासाठी किंजवडे गावात आतापासूनच उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे.

देवगड तालुक्यातील सिव्हिल इंजिनियर श्री. लक्ष्मण श्रीमंतसुळ यांनी स्वतः पुढाकार घेत किंजवडे गावात वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. पावसाचे उपलब्ध पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, तसेच आगामी काळातील पाण्याची गरज भागवण्यासाठी जलसाठा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

श्री. लक्ष्मण श्रीमंतसुळ यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल किंजवडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

येत्या आठ महिन्यांच्या कालावधीत गावातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी केवळ काही व्यक्तींवर अवलंबून न राहता प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या परिसरात वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांना पिशव्यांची आवश्यकता असल्यास त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. आजपासूनच या कामाला सुरुवात झाली असून, गावात जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

‘गावातील पाणी गावातच अडवा आणि जमिनीत जिरवा’ या उद्देशाने सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास आगामी पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात वनराई बंधारा उभारण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा