भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांचा पुढाकार; कच्चे बंधारे उभारण्यासाठी महिनाभर जेसीबी उपलब्ध
देवगड ,दि.०२ ऑक्टोंबर
यावर्षी सरासरीपेक्षा तुलनेने कमी पाऊस झाल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी विविध ठिकाणी कच्चे बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमित साटम यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार पाण्याचा योग्य वापर आणि पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत आहे. गावातील छोटे नाले, ओढे तसेच इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाणी अडवून ते योग्य पद्धतीने जमिनीत मुरविल्यास भूजलसाठा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी कच्चे बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
देवगड तालुक्यातील नगरपंचायत विभाग, कुणकेश्वर विभाग, जामसंडे विभाग आणि जिल्हा परिषद विभाग अशा विविध ठिकाणी उपलब्ध जागांचा पाहणी करून कच्चे बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक पदाधिकारी तसेच संबंधित नागरिकांच्या सहकार्याने ही कामे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कच्चे बंधारे उभारण्यासाठी जेसीबी उपलब्ध
या उपक्रमासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित साटम यांनी स्वतःचा जेसीबी एक महिन्यासाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कच्चे बंधारे उभारण्याच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच देवगड तालुक्यातील इतर जेसीबी मालकांनीही दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या गावातील ग्रामस्थांना वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन अमित साटम यांनी केले. जेसीबीच्या माध्यमातून बंधारे उभारण्यास मदत केल्यास कमी वेळेत अधिक काम पूर्ण करून पाण्याचे स्रोत बळकट करता येतील, असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला तालुका ज्येष्ठ नेते बाळ खडपे सरचिटणीस योगेश चांदोसकर भाजपा युवा शहराध्यक्ष दयानंद पाटील शहराध्यक्ष वैभव करगुटकर नगरसेविका प्रणाली माने नगरसेवक शरद ठुकरुल उल्हास मंचेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.