ठेकेदाराचे प्रलंबित बिल मंजुरीसाठी बोलावलेल्या सभेवर नगरसेवकांचा आक्षेप; नियमबाह्य असल्याचा आरोप
देवगड,दि.०६ ऑगस्ट
देवगड जामसंडे नगरपंचायतीची आयोजित करण्यात आलेली विशेष सभा नियमबाह्य असून ठेकेदाराचे प्रलंबित बील अदा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.त्यामुळे ही सभा त्वरीत रद्द करावी अशी मागणी नगरसेविका प्रणाली माने यांनी केली.या मागणीला सर्वच नगरसेवकांनी पाठींबा दिल्याने अखेर सभागृहाचा तीव्र विरोधामुळे विशेष सभा रद्द करण्यात आली.यावेळी विषयपत्रिकेवरील विषयावर आक्षेप नोंदवित सर्व नगरसेवकांनी हरकत घेतल्याने सभा रद्द करण्यात आली असे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी सांगीतले.
देवगड जामसंडे नगरपंचायतीची 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा कोरम अभावी तहकुब करण्यात आली होती.ही तहकुब सभा 6 ऑगस्ट रोजी न.पं.सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या सभेमधील विषयपत्रिकेवर देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या एएचपी प्रकल्पाची माहिती विषद करणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे व देवगड जामसंडे नगरपंचायत स्थापनेपासून ठेकेदार बिपीन विनायक कोरगावकर यांच्यामार्फत पाणीपुरवठा विभागाच्या करण्यात आलेल्या कामापैकी प्रलंबित असलेल्या देयकांबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे हे दोन विषय होते.सभेला व्यासपीठावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, पाणीपुरवठा सभापती सौ.तन्वी चांदोस्कर, स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी व बांधकाम सभापती रोहन खेडेकर उपस्थित होते. मात्र सभा सुरू होण्यापुर्वीच नगरसेविका प्रणाली माने यांनी ठेकेदाराच्या प्रलंबित बिल देयक या विषयावर आक्षेप घेतला.एखाद्या ठेकेदाराच्या बिलासाठी विशेष सभा आयोजित करता येते का?आणि ही सभा कोणत्या नियमाखाली घेण्यात आली? असे सवाल उपस्थित करत ही सभा नियमबाह्य असल्याचे सांगीतले.सौ.माने म्हणाल्या ठेकेदाराच्या प्रलंबित देयकासाठी अशी विशेष सभा घेतली जात असेल तर ती न.पं.च्या इतिहासातील पहिलीच सभा असेल.हा ठेकेदाराच्या देयकाचा विषय सभेच्या अजेंड्यावर नगराध्यक्षांना ठेवता येतो का याचा खुलासा करावा अशी मागणी माने यांनी नगराध्यक्षांकडे केली.
या चर्चेत स्वच्छता सभापती बुवा तारी, गटनेते शरद ठुकरूल, सौ.आद्या गुमास्ते,स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, सुधीर तांबे यांनीही सहभाग घेवून आक्रमक भुमिका घेतली. ठेकेदाराच्या कामाचे बिल काढण्यासाठी अशी सभा आयोजित करणे चुकीचे आहे. ही सभा योग्य नसून ती रद्द करावी आणि या विषयावर नेहमीप्रमाणे मासिक सभेत चर्चा व्हावी, अशी मागणी केली.सभेला ठेकेदाराला उपस्थित राहण्याचे निमंत्रण कोणी दिले?असा सवाल नगरसेवक बुवा तारी यांनी केला.यावेळी सभेला उपस्थित असलेले ठेकेदार बिपीन कोरगावकर यांनी सभेला उपस्थित राहण्याबाबत प्रशासनाकडून आपल्याला पत्र आल्याने आपण सभेला उपस्थित राहीलो असे सांगीतले.
प्रशासनाने ही सभा आयोजित करण्याबाबत लेखी पत्र दिले का असा प्रश्न सभापती बुवा तारी यांनी नगराध्यक्षांकडे केला.चंद्रकांत कावले यांनी सभा नियमबाह्य असल्याने रद्द करावी.प्रशासनाची जबाबदारी नगरसेवकांच्या माथ्यावर मारली जात आहे असा आरोप केला.नगरसेवकांच्या आक्षेपानंतर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी बाजु मांडताना या विषयासाठी विशेष सभा घेण्यात यावी असा ठराव फेब्रुवारी महिन्याचा सभेत मंजूर झाला होता.शिवाय हा विषय वारंवार सभांमध्ये येत असल्याने प्रशासनाच्या सुचनेनुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती असे स्पष्टीकरण दिले.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सभेतील ठरावाचे वाचन न.पं.प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
तरीही ही सभा नियमबाह्य असल्याचा पुनरूच्चार नगरसेवकांनी केला.तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या एएच्पी प्रकल्पाची माहिती विषद करण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित नाहीत.या विशेष सभेला मुख्याधिकारी यांचीही अनुपस्थिती आहे त्यामुळे ही सभा रद्द करावी अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.नगरसेवकांच्या आक्रमक भुमिकेनंतर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी ही सभा रद्द करीत असल्याचे जाहीर केले.