ठेकेदारांना पाठीशी नेमकं कोण? याबाबत जि. प. कर्मचाऱ्यांमध्येच रंगली “खमंग” चर्चा..!
जिल्हा परिषदेच्या असंवेदनशील कारभारामुळे कंत्राटी कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला…! प्रसाद गावडे
सिंधुदुर्ग,दि.०६ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत ५० कंत्राटी वाहनचालक आणि ६ लॅब टेक्निशियन
कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक होत असून सेवा पूरवठादार असलेली तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सी कर्मचाऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात असल्याचे चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत रंगली आहे. शिवाय यासंदर्भात तक्रारी होऊन देखील ठेकेदाराला पाठीशी नेमकं पदाधिकारी घालत आहेत की अधिकारी, नेमके हितसंबंध कोणाचे गुंतले आहेत, अधिकारी पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत का ?अशा खमंग चर्चां उद्याच्या जनरल बॉडी बैठकीच्या पार्श्वभूमीवर कानावर येत असल्याचे स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या कंत्राटी वाहन चालकांच्या मूळ निविदेत वेतन रक्कम २४५६९/- संस्था सेवा शुल्क ९४६/- व जीएसटी कर रक्कम ४४२२/- असे मिळून एकत्रित २९९३७/- रुपये प्रति कर्मचारी प्रति महिना मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्या खात्यात ठेकेदाराकडून फक्त १४ हजार प्रति महिना वेतन अदा होत आहे. म्हणजेच जीएसटी सेवा शुल्क वगळता उर्वरित १०५६९/- एवढी रक्कम निव्वळ ठेकेदाराच्या घशात जात असून कर्मचाऱ्यांचे होणारे आर्थिक शोषण व जिल्हा परिषदेची होणारी लूट पाहता जिल्हा परिषद व्यवस्थापन नेमकी बघ्याची भूमिका का घेत आहे असा सवाल गावडेंनी उपस्थित केला आहे. मागील आठ महिन्यात सेवा पुरवठादार असलेल्या तांडेल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पगारातील दरमहा ४ लाख ८० हजार एवढी रक्कम लाटली जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना देखील प्रशासन डोळे मिटून पाहत आहे, यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशाने जिल्हा परिषदेच्या एकूण कारभाराबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये “दाल में कुछ काला नहीं बल्की पुरी डाल हीं काली हैं” असा चुकीचा संदेश पसरला गेला असून अशाने कर्मचाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रवृत्ती वाढीस लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी ही समाधानकारक बाब नसून “म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकवता कामा नये” यासाठी जिल्हा परिषद व्यवस्थापनाने याकडे गांभीर्यपूर्वक पाहणे काळाची गरज असल्याचे प्रसाद गावडेंनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.