भाजपने प्रवेश घेतलेल्यांचा शिवसेनेशी संबंध काय? आधी नावे आणि पदे जाहीर करा; उगाच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका – दिनेश गावडे यांचा भाजपला टोला!
सावंतवाडी,दि. ३१ ऑक्टोबर
आंबोली मंडलातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्याने अथवा कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजपने ज्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे, त्यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे यापुढे पक्षप्रवेश घेताना संबंधित व्यक्तीचे नाव, पूर्वीच्या पक्षातील पद आणि राजकीय स्थान स्पष्ट करूनच प्रवेशाची घोषणा करावी. उगाचच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, अशा शब्दांत शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी भाजपला ठणकावले आहे.
आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली आंबोली मंडलातील काही शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, या वृत्तात भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवसैनिक नेमके कोण? त्यांची नावे काय? शिवसेनेत त्यांच्याकडे कोणती पदे होती? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा खुलासा करावा लागत असल्याचे दिनेश गावडे यांनी स्पष्ट केले.
आमच्या शिवसेनेतील एकाही पदाधिकाऱ्याने अथवा निष्ठावंत शिवसैनिकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला, शिवसेनेत फूट पडली, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रवेश म्हणजे नेमके काय आणि पक्षप्रवेश कोणत्या पद्धतीने घ्यायचा असतो, हे लवकरच मित्रपक्षाला समजेल, असा सूचक इशाराही गावडे यांनी दिला.
केवळ राजकीय वातावरण निर्मितीसाठी शिवसेनेला धक्का बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून जनतेचे मनोरंजन करू नये. भाजपने पक्षप्रवेशाची घोषणा करताना संबंधित कार्यकर्त्यांची नावे आणि त्यांची पूर्वीची राजकीय ओळख जाहीर करावी, असे आवाहनही शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी केले आहे.
आता भाजपनेच स्पष्ट करावे; प्रवेश केलेले ते शिवसैनिक नेमके कोण? असा सवाल या निमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.