भात कापणी व साठवणुकीबाबत कृषी विभागाचा सल्ला
सावंतवाडी,दि. ३१ ऑक्टोबर
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे ता. कुडाळ यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी आणि लगतच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती (सायक्लोनिक सर्क्युलेशन) कायम आहे. तसेच केरळ-कर्नाटक किनारपट्टीजवळील आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवरील चक्राकार वाऱ्यांपर्यंत पसरलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा (रेन ट्रफ) स्थिर आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे पुढील चार दिवस भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मेघगर्जनेसह होणारा पाऊस प्रामुख्याने दुपारनंतर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे भात कापणीची कामे करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.
भात पिकाचे ९० टक्के दाणे पिकल्यावर आणि रोपटे हिरवट असतानाच ‘वैभव’ विळ्याने जमिनीलगत सकाळच्या सत्रात कापणी करावी.एका दिवसात जेवढ्या पिकाची झोडणी (मळणी) करणे शक्य आहे, तेवढ्याच पिकाची कापणी करावी.
कापणीनंतर लगेचच झोडणी करून धान्य आणि पेंढा सुरक्षित ठिकाणी हलवावा.
कोणत्याही परिस्थितीत कापलेले भात पीक शेतात उघड्यावर ठेवू नये,असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.