राज्यभरातील ३५० हून अधिक ज्यूदोपट्टू सहभागी होणार
तळेरे,दि. ३१ ऑक्टोबर
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनतर्फे पुनित बालन ग्रुप प्रस्तुत ५३ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा २०२६ चे आयोजन १३, १४ व १५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन, आंबोली येथे करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन अध्यक्ष शैलेश टिळक व महासचिव श्री.दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक आंबोली पब्लिक स्कूल येथे नुकतीच संपन्न झाली.
असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला असोसिएशनचे खजिनदार अभिजित शेट्ये, स्पर्धा संयोजक चंद्रकांत शिंदे, सोनू जाधव, शैलेश सावंत(आंबोली), मंगेश घोगळे, दिनेश जाधव (सावंतवाडी), अजिंक्य पोफळे (फोंडाघाट), निलेश फोंडेकर (करुळ), शिवम म्हात्रे (सावंतवाडी) यांच्यासह जिल्ह्यातील ज्यूदो प्रशिक्षक उपस्थित होते.
बैठकीमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था, स्पर्धेच्या आयोजनाचे नियोजन, आवश्यक साहित्य, मैदान व अन्य सुविधांची उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध जबाबदाऱ्यांचे प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांमध्ये वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक निधी संकलनाबाबत चर्चा करून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या स्पर्धेत मुलांच्या नऊ व मुलींच्या नऊ अशा एकूण १८ वजनगटांमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले सुमारे ३५० हून अधिक गुणवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंबोलीच्या क्रीडानगरीत तीन दिवस ज्यूदोच्या चुरशीच्या लढतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे. ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया (JFI) च्या प्रचलित नियमांनुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथमच अशा मोठ्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक सज्ज झाले आहेत.