Devgad News :मिठमुंबरी-बागवाडी प्रकरणी ३ नोव्हेंबरला देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन!

शेअर करा

तक्रार करूनही संबंधितांवर कारवाई नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप; पारंपरिक मच्छीमारांसह नागरिक सहभागी होणार!

देवगड,दि. ३१ ऑक्टोबर
मिठमुंबरी बागवाडी येथील घटनेत गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार करूनही संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मिठमुंबरी- बागवाडी येथील राजाराम हरी आडकर व पारंपरिक ग्रामस्थांनी देवगड पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, मिठमुंबरी बागवाडी येथे घडलेल्या घटनेदरम्यान २७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली होती. तसेच ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांसोबत बराच वेळ प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. यावेळी पोलीस प्रशासनाने दोन दिवसांची मुदत मागून याबाबत निर्णय घेऊन कळविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुदत उलटूनही कोणताही निर्णय कळविण्यात आलेला नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींनी दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. असे असतानाही संबंधितांविरोधात अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असून त्यामुळेच ते कर्तव्यचोरपणा करीत आहेत, हे स्पष्ट होते. वारंवार तक्रारी करून आणि प्रत्यक्ष चर्चा करूनही न्याय मिळत नसल्याने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवगड पोलीस ठाणे येथे जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छीमार आणि नागरिक सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शेअर करा