कणकवली : जानवलीतील निवृत्त आर्मी जवानाच्या घरातून 3.5 लाखांच्या मंगळसूत्राची चोरी..

शेअर करा

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; देवघरात ठेवलेला दागिना लंपास

कणकवली,दि.०७ ऑगस्ट

कणकवली तालुक्यातील जानवली घरटनवाडी येथील निवृत्त आर्मी जवानाच्या घरातून तब्बल ३ लाख २५ हजार ५५२ रुपये किमतीचे 6 तोळे ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघ़डकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलीप गणपत राणे (वय ६२ रा. जानवली घरटनवाडी, ता. कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते पत्नी दीप्ती राणे यांच्यासह राहतात, तर मुलगी धनश्री राणे ही नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असते. फिर्यादींच्या पत्नी दीप्ती राणे या गंभीर आजारांनी त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी ७ ऑगस्ट रोजी गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जाण्याचे नियोजन असल्याने त्यांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपले मंगळसूत्र घरातील देवघरात ‘वामन हरी पेठे’च्या पाऊचमध्ये ठेवले होते. त्याच दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पत्नीची औषधे आणण्यासाठी ओरोस येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये गेले. दुपारी सुमारे १२.१० वाजता ते घरी परतल्यानंतर पत्नीने देवघराजवळ काहीतरी आवाज आल्याचे सांगत मंगळसूत्र तपासण्यास सांगितले. त्यानंतर देवघरातील पाऊच उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले मंगळसूत्र आढळून आले नाही. घरात सर्वत्र शोध घेऊनही ते आढळून आले नाही. फिर्यादी औषधे आणण्यासाठी बाहेर गेले असताना त्यांची सख्खी भाची कविता चंद्रकांत सावंत ही पूर्वनियोजितप्रमाणे त्यांना पाहण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी घरी आली होती. त्या वेळेत फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीशिवाय इतर कोणीही घरात आले नव्हते.

चोरीस गेलेले मंगळसूत्र हे पाच पदरी, काळ्या मण्यांसह सोन्याची चैन साखळी व सोन्याची छोटी पट्टी असलेले जुने वापरातील मंगळसूत्र असून त्याची किंमत ३ लाख २५ हजार ५५२ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.१० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने जानवली घरटनवाडी येथील राहत्या घरातील तिसऱ्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या ‘वामन हरी पेठे’च्या पाऊचमधून सदर मंगळसूत्र लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची तक्रार दिली . अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहे.

शेअर करा