बुवा प्रकाश पारकर यांची माहिती; हिंदू समाज संस्कृती रक्षणाची होणार जनजागृती
कणकवली,दि.०७ ऑगस्ट
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने भारुडाच्या माध्यमातून पुराण, संतपरंपरा आणि हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकळी १० वाजता नांदगाव तिठा पुलाखाली राज्यातील पहिल्या ‘भारुड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली.
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था सेवाभावी कार्य करत आहे. सध्या २०-२० भजनांच्या वाढत्या प्रचलनामुळे भारुड सादरीकरणाचे प्रमाण कमी होत असून पुराणातील कथा, संतवाङ्गय आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असलेले भारुड जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथ कळला तर संत कळतो आणि संत कळला तर भगवंत कळतो, या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिल्या भारुड महोत्सवाचे आयोजन बुवा प्रकाश पारकर यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक भजनी बुवा रामायण, महाभारत, शिवलीलामृत, गणेश पुराण, गरुड पुराण यांसारख्या ग्रंथांतील स्वतंत्र कथानकावर आधारित भारुड सादर करणार आहे. या महोत्सवासाठी तालुक्यातील नामवंत भजनी बुवांना निमंत्रित करण्यात आले असून बुवा संतोष मिराशी, बुवा चंद्रकांत गुरव, बुवा मंगेश खाडये, बुवा हेमंत तेली, बुवा सुजित परब, बुवा उदय राणे, बुवा सतीश सावंत (भिरवंडे), बुवा प्रथमेश चव्हाण (फोंडा), बुवा ऋतुजा पाळेकर, बुवा गनंजय तेली तसेच इतर निमंत्रित भजनी बुवा भारुड सादर करणार आहेत. भारुडांचे सादरीकरण सायंकाळपर्यंत चालणार आहे. हा भारुड महोत्सव संतपरंपरा, पुराणपरंपरा आणि भारुड या लोककलाप्रकाराचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुवा प्रकाश पारकर यांनी केले आहे.