ग्रामीण रस्त्यांसह महामार्गावर अनेक अपघात ; रेफर टु गोवा मेडिकल कॉलेज हे केव्हा बंद होणार ?
कणकवली,दि.१४ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेमुळे अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जिल्ह्यातील राज्यमार्ग, ग्रामीण रस्ते ,ग्रामसडक योजनेतील रस्ते, महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर सत्ताधा-यांच्या टक्केवारीमुळे दुरावस्था झाली आहे. खड्डेमय रस्ते, रखडलेली विकासकामे आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय येथुन रुग्णांना रेफर टु गोवा मेडिकल कॉलेज केले जाते, ते केव्हा बंद होणार ? या रस्त्यांवर होणा-या अपघातांना जबाबदार कोण ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी व्यापले असून अनेक अपघातांमध्ये नागरिकांना हातपाय किंवा जीव गमवावा लागला आहे. मुंबई-गोवा महामार्गासह सर्व्हिस रोडचीही अत्यंत खराब अवस्था झाली असून नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जात नाही, दंडात्मक कारवाई केली जात नाही किंवा नोटीसही बजावली जात नाही. यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही श्री.उपरकर यांनी केला. जिल्हा परिषदेतील कथित गैरव्यवहार आणि खोट्या स्वाक्षरी प्रकरणातील आरोपींवर अद्यापही कारवाई होत नाही. त्यांचे जामीन फेटाळले असताना त्यांना अटक केली जात नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
पालकमंत्र्यांच्या आजोळी व खासदारांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम २०२३ मध्ये सुरू झाले. मात्र, २०२६ उजाडूनही ते पूर्ण झालेले नाही. संबंधित ठेकेदार काम करत नसतानाही त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नाही. फोंडा आणि विजयदुर्ग मार्गांचीही अशीच बिकट अवस्था असून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती न करता प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांवर व्यवस्था चालवली जात आहे. जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना गोव्यात रेफर करावे लागत आहे. आरोग्य सुविधा सुधारण्याच्या केवळ घोषणा होत असून प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शिंदे गटाते आमदार केवळ सभागृहात प्रश्न उपस्थित करून समस्या सुटत नाहीत, तर त्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे.त्यासाठी प्रयत्न करावेत , असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.