देवगड,दि.०३ सप्टेंबर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार देवगड पंचायत समितीच्या वतीने इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात देवगड एसटी आगारातील गैरसोयींचा मुद्दा ऐरणीवर आला. आगारात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षा’ला नेहमी टाळे असते, तसेच कक्षामध्ये केवळ एक टेबल ठेवण्यात आले असून बांधकामाची अवस्थाही समाधानकारक नसल्याची तक्रार देवगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केली.
‘हिरकणी कक्ष म्हणजे नेमके काय आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो?’ अशी विचारणा त्यांनी देवगड एसटी आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांच्याकडे केली. मात्र एसटी प्रशासनाकडून देण्यात आलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी जिल्हा परिषद सदस्यांसमवेत प्रत्यक्ष एसटी आगारात जाऊन हिरकणी कक्षाची पाहणी केली.
जनता दरबारात मांडलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसलेली परिस्थिती यामध्ये फारसा फरक नसल्याचे निदर्शनास आल्याने सभापती गणेश राणे व जिल्हा परिषद सदस्या सावी लोके यांनी नाराजी व्यक्त केली.
महिलांसाठी असलेला हिरकणी कक्ष कायमस्वरूपी खुला व वापरण्यायोग्य असावा. कक्षामध्ये तात्काळ बेडची व्यवस्था करण्यात यावी, कक्षाची आवश्यक दुरुस्ती करून तो पूर्णपणे बंदिस्त करण्यात यावा, तसेच त्याला कायम टाळे लावून ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना सभापती गणेश राणे यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.
विद्यार्थ्यांच्या बसला विलंब; महिला कर्मचाऱ्याच्या उत्तरावर लोकप्रतिनिधी आक्रमक
याचवेळी एसटी आगाराची पाहणी सुरू असताना विद्यार्थ्यांच्या बसला विलंब झाल्याची बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आली. विद्यार्थ्यांनी याबाबत सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना माहिती देत संबंधित महिला कर्मचाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली.
याबाबत सभापती गणेश राणे व जि. प. सदस्या सावी लोके यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. मात्र मिळालेली उत्तरे समाधानकारक नसल्याने सावी लोके यांनी नाराजी व्यक्त करत, “तुम्ही कोणाशी बोलता याचे भान ठेवा. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत विचारणा करीत आहोत. त्यामुळे बोलताना काय बोलता याचे भान ठेवा,” अशा शब्दांत खडे बोल सुनावले.
लोकप्रतिनिधींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याची भाषा नम्र झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना एसटी सेवेमुळे होणारी गैरसोय गांभीर्याने घेत सभापती गणेश राणे यांनी आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांना संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करून त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. “कर्मचारी अपुरे आहेत हे मान्य आहे; मात्र सामान्य जनतेशी अशा पद्धतीने वागणे अपेक्षित नाही. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्या,” अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, संजना आळवे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष किंजवडेकर, गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.