नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी ; दिवाळीच्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांना होणार सोयीचे
कणकवली,दि.०२ नोव्हेंबर
शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दिवाळी बाजाराची लगबग सध्या सुरू झाली असून, बाजाराच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिवाळी बाजाराच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध वस्तू उपलब्ध व्हाव्यात, स्थानिक व्यावसायिक, बचतगट तसेच छोट्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या बाजारात दिवाळी सणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू, फराळाचे पदार्थ, मातीची पणती, आकाशकंदील तसेच इतर आकर्षक वस्तूंची विक्री होणार असल्याने नागरिकांनाही खरेदीचा आनंद घेता येणार आहे. बाजाराच्या नियोजनाची आणि प्रत्यक्ष ठिकाणी सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना केल्या.
यावेळी नगरसेवक लोकेश कांबळे, जयेश धुमाळे, निकित मूरकर, तेजस राणे, वैभव मालंडकर ,अमित मयेकर आदी उपस्थित होते.
शहर विकास आघाडीच्या या दिवाळी बाजारामुळे कणकवलीतील दिवाळी खरेदीला विशेष रंगत येणार असून, स्थानिक विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या दिवाळी बाजाराला भेट देऊन स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.