बांदा : गणेशोत्सवापूर्वी बांदा–सटमठवाडी रस्ता दुरुस्त करा

शेअर करा

रस्त्याची दयनीय अवस्था; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बांदा,दि.०३ सप्टेंबर
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बांदा–सटमठवाडी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सटमठवाडी ग्रामस्थांनी केली असून, मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बांदा ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने सटमठवाडीतील अनेक महिला तसेच पुरुष बांदा बाजारपेठेत विविध दुकानांमध्ये कामासाठी दररोज ये-जा करतात. रस्त्याची खराब अवस्था असल्याने त्यांना अनेकदा पायी प्रवास करावा लागत असून, खड्ड्यांमधून वाट काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी आणि वाहतुकीची वाढ लक्षात घेता या रस्त्याची अवस्था अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची भीती असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामस्थांना दिलासा न दिल्यास सटमठवाडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बांदा–सटमठवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली झाडी व साफसफाईची कामे दोन दिवसांपूर्वीच करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी दिली.

शेअर करा