कारवाईत ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त ; संशयित आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
कणकवली,दि.०७ ऑगस्ट
तालुक्यातील तळेरे एसटी स्थानक परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली . या कारवाईत संशयित आरोपी विनय विश्वनाथ महाडीक (वय ३७, रा. तळेरे बाजारपेठ) याच्यावर कारवाई केली असुन ४२ हजार १३० रुपयांचा रोख रक्कमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल बरगे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारच्या सत्रात तळेरे एसटी स्थानकाजवळील एका हॉटेल लगत असलेल्या दुकान गाळ्यावर छापा टाकला. कारवाई दरम्यान विनय महाडीक हा कल्याण मटका जुगारासाठी लोकांकडून पैसे स्वीकारताना आढळून आला. त्याच्याकडून ३३ हजार ११० रुपये रोख रक्कम, रेडमी कंपनीचा मोबाईल, मटका आकडेमोडीचा कागद, बुक, कॅल्क्युलेटर व अन्य साहित्य असा एकूण ४२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गणेश साटम (रा. तळेरे) याच्या सांगण्यावरून मटका स्वीकारला जात असल्याची माहिती समोर आली असून, विनय विश्वनाथ महाडीक व गणेश साटम या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ४९ अन्वये कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.