माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची मागणी; अन्न व औषध प्रशासनाने शासकीय दरात तपासणी सुविधा उपलब्ध करावी
कणकवली ,दि.०७ ऑगस्ट
राज्यात अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात प्रशासकीय यंत्रणेतील काही प्रकारची मनमानी कारभार सुरु आहे. हॉटेल व्यावसायिक व व्यापारी दबावाखाली असल्यामुळे या विभागाच्या विरोधात बोलत नाहीत. कणकवली शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना अन्न व पाणी तपासणीच्या नावाखाली अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कणकवलीत 900 रुपयांची पाणी तपासणी 2300 रुपयाला व 1 पदार्थ तपासणी 1 हजार रुपयांना करण्यात आली. ही व्यापा-यांची लुट असून अन्न व औषध प्रशासनाने खासगी लॅबकडून अन्न-पाणी तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली.
कणकवली येथे बोलताना ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी महासंघ व हॉटेल व्यावसायिकांसाठी पाणी व अन्नपदार्थ तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पाणी तपासणीसाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध असताना खासगी प्रयोगशाळांकडून तपासणी का केली जात आहे? खासगी प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीसाठी सुमारे २३०० रुपये, तसेच अन्नपदार्थांच्या नमुन्यांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात आहे. शासकीय यंत्रणेकडे तपासणीची सुविधा नसल्यामुळे खासगी लॅबची शिफारस केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. कणकवली शहरातूनच तपासणीच्या शुल्कापोटी लाखो रुपये जमा झाले असून जिल्हाभरात अशीच प्रक्रिया सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडणार आहे.
या तपासणी दरम्यान संबंधित कंपनींकडून अन्नपदार्थांचे नमुने घेण्याच्या पद्धत चुकीची आहे. सकाळी घेतलेले अन्नपदार्थांचे नमुने संध्याकाळपर्यंत कसे ठेवले जातात, नमुना नेमका कुठून घेतला जातो आणि तपासणीची प्रक्रिया काय आहे, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. अन्न व औषध विभागाच्या धोरणानुसार शक्य असल्यास तपासणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व निर्धारित शासकीय दरात होणे आवश्यक आहे. व्यापा-यांना 1 हजार रुपयांच्या कामासाठी ३३०० रुपये द्यावे लागले. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करीत आहे. व्यापाऱ्यांवर आर्थिक भार टाकण्याऐवजी शासनाने स्वतःची तपासणी यंत्रणा सक्षम करून कमी दरात सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बंडू हर्णे यांनी केली.