मध्य रेल्वेची मोठी तयारी; मुंबई, पुणे व नागपूरहून २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित गाड्या
कणकवली,दि.१ सप्टेंबर
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठी तयारी केली असून २६२ गणपती विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणातील विविध ठिकाणांसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत.
९ सप्टेंबर २०२६ पासून गणपती विशेष रेल्वे सेवांना सुरुवात होणार आहे. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या २०० आरक्षित विशेष गाड्यांमधून १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नियमित गाड्यांवरील वाढता ताण कमी करून प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या काळात तिकीट प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विविध स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या आणि प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षा क्षेत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोफत पिण्याचे पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारीही रेल्वे प्रशासनाने केली आहे. विशेष गाड्यांमध्ये शिस्तबद्ध प्रवेशासाठी रांग व्यवस्थापन प्रणाली लागू केली जाणार असून गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून स्थानकांवरील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली जाणार आहे. प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर तसेच NTES ॲपवर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य दराने तिकीट सुविधा UTS प्रणालीद्वारे उपलब्ध असून तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांनी ‘रेलवन’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांनी केवळ वैध तिकीट आणि वैध ओळखपत्र सोबत ठेवावे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखद आणि सुरळीत व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे.