कणकवली : तळेरे येथे महामार्गावर ५५ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त..

शेअर करा

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कणकवली,दि.०३ ऑगस्ट

कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळेरे औदुंबरनगर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शांताराम गवस व त्यांच्या पथकाकडून रविवारी २ ऑगस्ट दुपारी ३.५५ वाजण्याच्या सुमारास तळेरे औदुंबरनगर येथे महामार्गावर वाहन तपासणी सुरू होती. त्यावेळी गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर मालवाहू टेम्पो संशयास्पद वाटल्याने तो थांबवून तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये ‘रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्की’ लेबल असलेले ८०० बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४८ बाटल्या, अशा एकूण ३८ हजार ४०० गोवा बनावटीच्या सीलबंद मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या मद्यसाठ्याची किंमत ३८ लाख ४० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चालक नितीश रमेश तांबोसकर (वय ३७, रा. चराठे टेंबवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हेड कॉन्स्टेबल विजय बिर्जे, हेड कॉन्स्टेबल एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, पोलीस कॉन्स्टेबल खडपकर आणि सागर परब यांनी केली.

शेअर करा