नकाशा नकलांसाठीही शेकडो अर्ज रखडले ; ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशीच कार्यालयाची अवस्था
सिंधुदुर्ग,दि.०३ ऑगस्ट
महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून गतीमान प्रशासन करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेत आहेत. राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसुल विभागात गतीमान प्रशासन देण्याच्या दृष्टीने विविध योजना आणल्या आहेत. भूमीअभिलेख विभाग शेतजमीन व मालमत्तेची मोजणी , नकाशे , सातबारा प्रॉपर्टी कार्ड , रेकॉर्ड सांभाळणारा मुख्य विभाग आहे. आता या विभागातील गतीमानता आणण्याच्या दृष्टीने दृतगती 1 महिन्यात व नेहमी 3 महिन्यांत मोजणी करण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतला. मात्र, कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात 866 मोजणीची प्रकरणे रखडली आहेत. तसेच नकाशा नक्कलेसह विविध नकलांचे 250 ते 300 अर्ज रखडले आहेत. त्यामुळे ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशीच कार्यालयाची अवस्था झाली असून याकडे सिंधुदुर्ग दौ-यावर असलेले महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लक्ष देतील का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
आपल्या जमीन मिळकतीची मोजणी हद्द निश्चित करण्यासाठी किंवा पोटहिस्सा मोजणी करण्याकामी गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ब-याच महिन्यांपासून रिक्त पदे या कार्यालयात असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झालेला आहे. कणकवली येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीची तब्बल 866 प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय नकाशा नकल , योजनापत्रक , आकारबंद यासह विविध नकला मिळविण्यासाठी दाखल अर्ज आहेत.सुमारे 250 ते 300 नकलांसाठी दाखल अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. जमिनीची खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारसा नोंद, बांधकाम परवानगी, न्यायालयीन प्रकरणे तसेच विविध शासकीय कामांसाठी मोजणी अहवाल आणि नकाशा नकल आवश्यक असते. मात्र, वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक व्यवहार रखडत असून नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
आता ऑनलाईन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत तारीख मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. तसेच नकाशा नकलासाठी ऑफलाइन अर्ज करूनही वेळेत प्रत उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे अडकून पडली आहेत. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” अशीच परिस्थिती या कार्यालयात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रभारी उप भूमी अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता, वाढता कामाचा ताण आणि तांत्रिक अडचणी यामुळे प्रकरणांचा निपटारा संथ गतीने होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, याचा थेट फटका नागरिकांना बसत असून शेतकरी आणि जमीनधारक आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करत आहेत. नागरिकांनी प्रलंबित मोजणी प्रकरणे आणि नकाशा नकल अर्जांचा विशेष अभियान राबवून जलद निपटारा करावा, अशी मागणी होत आहे.
बॉक्स –
प्रभारींकडे उपअधिक्षक भूमी अभिलेख अधिका-यांचा पदभार
वैभववाडी येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख एस.व्ही.गवारे यांच्याकडे गेल्या 2 वर्षापासून कणकवली कार्यालयाचा पदभार आहे. त्याचबरोबर या कार्यालयात भूमापक व कार्यालयीन कर्मचा-यांची रिक्त पदे होती. आताच काही दिवसांपूर्वी या पदांवर कर्मचा-यांची नियुक्ती झाली आहे. ऑगस्ट महिन्यांत 190 मोजणीची प्रकरणे भूमापनकडे वाटप करण्यात आलेली आहेत, असे कार्यालयीन अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे.
बॉक्स –
रेकॉर्ड जीर्ण झाल्याने अनेक अडचणी –
कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात अनेक गावांमधील जमीन मिळकत नकाशा व फेरफार नोंदी , मालमत्ता पत्रक व विविध नकलांसाठी आवश्यक असलेले अभिलेखातील रेकॉर्ड जीर्ण झाले आहे. ब-याच गावांमधील काही मिळकतींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे आढळून येत नाहीत. त्यामुळे एका बाजुने डिजीटल सेवांकडे सरकार वळत असताना या कार्यालयातून रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.