सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक दीपक घोडे यांचे ग्रामस्थांना आश्वासन ; माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी घेतली भेट
कणकवली ,दि.०३ ऑगस्ट
कणकवली आगारातून गेली काही महिने कणकवली भिरवंडे बस फेऱ्या अनियमित आणि व्हाया कुंभवडे सोडण्यात येत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत होता.यासाठी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी विभाग नियंत्रक राज्य परिवहन सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी कधी गाड्या कमी तर कधी चालक वाहक कमी असल्याचे कारण देऊन गाड्या व्हाया कुंभवडे सोडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे शालेय, कॉलेजच्या विद्यार्थी आणि प्रवाशांना ग्रामस्थांना कनेडी बाजारपेठ येथे उतरवून बस कुंभवडे ला जाऊन येई पर्यंत वाट पाहावी लागत असायची. तसेच बस वेळेत सोडली जात नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या वेळेप्रमाणे एसटी बस सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक श्री. घोडे यांनी सर्व बस व्हाया न करता पूर्ववत आणि वेळेवर सोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पत्रकार विनय सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, श्रीकांत सावंत, प्रकाश सावंत, संदीप सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.