सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत गौरव; दहा हजार नागरिकांपर्यंत पोहोचवला व्यसनमुक्तीचा संदेश
कणकवली,दि.१३ जून
नशाबंदी क्षेत्रातील प्रबोधन कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे ५ ते ७ जून २०२६ दरम्यान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते अर्पिता मुंबरकर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राज्य संघटक अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, ज्येष्ठ सदस्य बॉस्को डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ३६ जिल्हा संघटकांमध्ये अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्तीच्या प्रबोधन कार्यात विशेष मेहनत घेतली. वर्षभरात तब्बल दहा हजार नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. या कार्याची दखल घेत त्यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नागपूर जिल्हा संघटक गौरव आळणे यांना सिल्वर मेडल तर पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांना ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आले. तसेच विभागीय संघटक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे विभागाच्या टीमला सन्मानचिन्ह व तीन हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली. कोकण विभागाच्या अर्पिता मुंबरकर यांच्या टीमला द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह व दोन हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
बैठकीत राज्यातील शाळा व महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याचा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला. नशामुक्त भारत अभियानाला अधिक बळ देण्यासाठी सर्व जिल्हा संघटकांनी एकत्रितपणे वार्षिक नियोजन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. राजन वेळूकर यांनी नशाबंदी मंडळाचे काम गेल्या ६८ वर्षांपासून सुरू असून जिल्हा संघटक हे व्यसनमुक्ती चळवळीतील महत्त्वाचे योद्धे असल्याचे सांगितले. बदलत्या व्यसनांच्या प्रकारांनुसार आधुनिक पद्धतीने समुपदेशन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष वर्धाच्या डॉ. निकिता व त्यांच्या टीमनेही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी वर्धा जिल्हा समाज कल्याण विभागाचे निरीक्षक राज मरापे यांनी संघटकांच्या कार्याचे कौतुक केले.
या तीन दिवसीय बैठकीत सर्व जिल्हा संघटकांनी व्यसनमुक्तीचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.