अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांची माहिती; हिंदू समाज संस्कृतीच्या रक्षणासाठी भजन कला आवश्यक
कणकवली,दि.०५ ऑगस्ट
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने भारुडाच्या माध्यमातून पुराण, संतपरंपरा आणि हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकळी 10 वाजता नांदगाव तिठा पुलाखाली राज्यातील पहिल्या ‘भारुड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली.
कणकवली शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सदस्य बुवा मंगेश खाडये, मारुती मेस्त्री, लक्ष्मण बागवे, मयूर ठाकूर, सुदर्शन फोपे, शेखर चव्हाण, उदय पारकर, पंढरी जाधव, श्रीकांत शिरसाट, चंद्रकांत गुरव, महानंदा चव्हाण, प्रकाश मेस्त्री आदींसह भजनी बुवा मंडळी उपस्थित होते.
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था सेवाभावी कार्य करत असून भजन स्पर्धा, वाद्य स्पर्धा, गायन स्पर्धा, सामाजिक उपक्रम तसेच आपत्तीच्या काळात गरजू भजनी बुवांना मदत करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. कोरोना काळातही आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक भजनी बुवांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम संस्थेने केले. सध्या २०-२० भजनांच्या वाढत्या प्रचलनामुळे भारुड सादरीकरणाचे प्रमाण कमी होत असून पुराणातील कथा, संतवाङ्गय आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असलेले भारुड जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथ कळला तर संत कळतो आणि संत कळला तर भगवंत कळतो, असे सांगत त्यांनी ग्रंथसंवर्धन आणि संस्कृती जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पहिल्या भारुड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक भजनी बुवा रामायण, महाभारत, शिवलीलामृत, गणेश पुराण, गरुड पुराण यांसारख्या ग्रंथांतील स्वतंत्र कथानकावर आधारित भारुड सादर करणार आहे. यामुळे नव्या पिढीतील भजनी बुवांमध्ये भारुडाविषयी आकर्षण निर्माण होईल, तसेच वाचन आणि धर्मग्रंथांविषयीची आवड वाढेल, असा विश्वास बुवा प्रकाश पारकर यांनी व्यक्त केला आहे.
या महोत्सवासाठी तालुक्यातील नामवंत भजनी बुवांना निमंत्रित करण्यात आले असून बुवा संतोष मिराशी, बुवा चंद्रकांत गुरव, बुवा मंगेश खाडये, बुवा हेमंत तेली, बुवा सुजित परब, बुवा उदय राणे, बुवा सतीश सावंत (भिरवंडे), बुवा प्रथमेश चव्हाण (फोंडा), बुवा ऋतुजा पाळेकर, बुवा गनंजय तेली तसेच इतर निमंत्रित भजनी बुवा भारुड सादर करणार आहेत. भारुडांचे सादरीकरण सायंकाळपर्यंत चालणार आहे. हा भारुड महोत्सव संतपरंपरा, पुराणपरंपरा आणि भारुड या लोककलाप्रकाराचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वासही श्री. पारकर यांनी व्यक्त केला.