जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
कणकवली, दि.०३ जुन
कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व इतर भेटवस्तू न आणता झाडे किंवा वह्या भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात वह्या व वृक्षरोपांचे संकलन करण्यात आले आहे.
कलमठ येथील श्री देव काशीकलेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसभापती सोनू सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, सरपंच संदीप मेस्त्री, करुणा घाडी, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच सुहास राणे यांच्यासह जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलित करण्यात आलेल्या वह्यांचे वितरण मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी दिली. पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक मदत या दुहेरी उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक होत आहे.