पत्नीचा शोध लागेना; अपहरणाचा गुन्हा दाखल
कणकवली,दि.११ ऑक्टोबर
कणकवली पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असलेली विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीचा शोध घेऊनही ती सापडत नसल्याने तिचे पती सचिन अशोक माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात जबाब नोंदविला असून, अज्ञात व्यक्तीने पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे, सचिन अशोक माने (वय ३८) हे मागील सुमारे पाच वर्षांपासून कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नी या देखील कणकवली पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. माने दाम्पत्य आपल्या मुलासह नाडकर्णीनगर येथील संचयनी कॉम्प्लेक्स परिसरात वास्तव्यास आहे.सचिन माने यांचे वडील अशोक माने व मुलगा सार्थक हे त्यांच्यासोबत राहतात. तर त्यांची आई शांताबाई, भाऊ शरद व पुतण्या आदित्य हे मूळ गावी कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथे राहतात. पत्नीची प्रशासकीय बदली झाल्याने बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी करण्यात येत होती.
रात्री एकत्र जेवण, सकाळी पत्नी बेपत्ता
सचिन माने यांनी दिलेल्या जबाबानुसार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री ते पत्नी व मुलगा सार्थक यांच्यासह घरी होते. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपले.९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता सचिन माने यांना जाग आली. त्यावेळी पत्नी मुलगा सार्थक याला शाळेत जाण्यासाठी तयार करत होती. काही वेळाने सचिन माने पुन्हा झोपले. सकाळी सुमारे ८ वाजता त्यांना जाग आली असता पत्नी घरात दिसून आली नाही.
मोबाईल घरातच, परिसरात शोध घेऊनही थांगपत्ता नाही
पत्नी घरात दिसत नसल्याने सचिन माने यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मोबाईल घरातच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी घरात व आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.त्यानंतर त्यांनी मुलगा सार्थक याच्या शाळेत जाऊन पत्नीबाबत चौकशी केली. मात्र, पत्नी शाळेत आली नसल्याचे समजले. यानंतर कणकवली शहरात विविध ठिकाणी तसेच नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशी करूनही पत्नीचा शोध लागला नसल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.