कणकवली : कोळोशी व ओटव येथे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेअर करा

कणकवली,दि. १२ जून
कृषी विभाग, आत्मा आणि किर्लोस कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026-27 अंतर्गत ‘खेत बचाओ अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. 11 जून 2026 रोजी कोळोशी व ओटव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण आणि खरीप हंगामपूर्व तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भास्कर काजरेकर, एटीएम विनायक पाटील, उपकृषी अधिकारी श्रीमती तांबे, कृषी सेवक श्री. पवार, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच श्री. गुरव, माजी सरपंच रितिका सावंत, उपकृषी अधिकारी श्रीमती निरवडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती तेली, ओटव सरपंच दुर्गेश ओटवकर तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी भास्कर काजरेकर यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर पिकांचे व्यवस्थापन, हवामानातील बदलांमुळे होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी संतुलित खतांचा वापर कसा करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

खरीप हंगाम मोहिमेअंतर्गत उपकृषी अधिकारी श्रीमती तांबे यांनी बीज प्रक्रिया, दर्जेदार बियाण्यांची निवड आणि बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे विनायक पाटील यांनी ‘गोकृपा अमृत कल्चर’ याचे प्रात्यक्षिक सादर करून त्याचे शेतीमधील फायदे स्पष्ट केले. तर कृषी सेवक श्री. पवार यांनी बायोचार तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करत त्याचा मृदा सुपीकता वाढविण्यासाठी होणारा उपयोग शेतकऱ्यांना समजावून सांगितला. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयुक्त माहिती मिळाली असून आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेअर करा