कणकवली : ट्रोल होण्याच्या भीतीपायी पालकमंत्र्यांनी जेनझींच्या आंदोलनावर बोलणे टाळले – परशुराम उपरकर

शेअर करा

कणकवली ,दि.३१ जुलै

नीट पेपर फुटी प्रकरणी व केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या कारभाराविरोधात जेनझींने जंतरमंतरवर आंदोलन केले. देशातील सर्व धर्मिय तरुणांनी एकत्र येऊन केलेले हे आंदोलन भारताच्या इतिहासातील यशस्वी आंदोलन ठरले. जेनझींच्याविरोधात बोलणाºया भाजपच्या नेत्यांची नेटकºयांनी त्यांना ट्रोल करून त्यांची बोलती बंद केली आहे. स्व:ताला हिंदूंचे गब्बर समजणारे पालकमंत्री नितेश राणे यांनी जेनझींच्या विरोधात आपण बोललो तर नेटकरी आपल्याला ट्रोल करतील या भीतीने त्यांनी जेनझींच्याविरोधात बोलणे टाळले, असा टोला ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. देवगड तालुक्यातील मुगणे येथील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. या प्रकल्पाच्याविरोधात तरुणांनी पुढाकार घेऊन आंदोलन उभे करावे, या आंदोलनास ठाकरे शिवसेना व सिंधुुदुर्गवासीयांचा पाठिंबा असेल, असे उपरकर यांनी सांगितले.


येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, नीट पेपर फुटीप्रकरणात देशातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारीमुळे अनेक तरुण जखमी झाले. मात्र, तरुणांनी आंदोलन सोडले नाही. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. परिणामी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, असे उपरकर म्हणाले.
सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री हे फसव्या घोषणा करून सिंधुदुर्गवासीयांची दिशाभूल करीत आहेत.

त्यामुळे या लोकप्रतिनिधींबद्दल जनतेतून नाराजी आहे. मुगणे येथील अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाच्याविरोधात ठराव घेतला आहे. अणुऊर्जाप्रकल्पाला ग्रामस्थांचाविरोध आहे. मात्र, या संदर्भातही पालकमंत्री नितेश राणे हे काहीच बोलत नाहीत. अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा देवगड तालुक्यातील आंब्यांच्या झाडांमुळे आम्हाला रोजगार मिळेल असे तरुण पिढीला वाटत असून त्यांनीही या प्रकल्पाच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशातील जेनझीच्या पिढीतील तरुणांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेले सत्ताधाºयांना ही जेनझी भविष्यात सळो की पळो करून सोडून देशात नवीक्रांती करतील, असा आम्हाला विश्वास आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीत तरुण पिढीने पुकारलेल्या आंदोलनास ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाराष्टÑातील युवा पिढी ठाकरेंच्या पाठिंशी असल्याचे दिसून आल्याने भाजपच्या नेतेमंडळींच्या पायाखालची वाळू सरकरली आहे, असा दावा त्यांनी केला.

शेअर करा