सिंधुदुर्गात आरोग्य शिबिरे, रक्तदान व १० हजार काजू कलमांचे वाटप ; जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती
कणकवली,दि.२० जुलै
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जनसेवा सप्ताह’ विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन २२ जुलैला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सहभागातून हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी अबिद नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सचिव सावळाराम अणावकर, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्यांक महासचिव रफीक खान, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालंडकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर ढेकणे, लियाकत काझी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, शहराध्यक्ष इम्रान शेख, सचिन अडुळकर आदी उपस्थित होते.
अबिद नाईक म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष म्हणून सिंधुदुर्गातील आठही तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली. मात्र, यंदा त्यांच्या निधनानंतर प्रथमच त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ पक्षावर आली असून, हा क्षण कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. अजित पवार यांनी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला उभारी दिली, बळ दिले आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. त्यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी काम सुरू ठेवले असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यात २२ ते २८ जुलै हा कालावधी ‘जनसेवा सप्ताह’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील आठही तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, कर्करोग तपासणी शिबिरे, वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी स्व. अजित पवार यांनी केलेल्या कार्याची आठवण करून देताना नाईक म्हणाले की, गेली अनेक वर्षे त्यांच्या वाढदिवसानिमित्त काजू कलमांचे वाटप करण्यात येते. यंदाही जिल्हाभरात सुमारे १० हजार काजू कलमांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय अल्पसंख्याक विभाग, युवक राष्ट्रवादी, महिला आघाडी, ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, व्हीजेएनटी सेल आदी पक्षाच्या विविध आघाड्यांमार्फत स्वतंत्र समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी कणकवली येथे वृक्षवाटप, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचा जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पक्षाचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ओरोस येथे २२ ते २८ जुलैदरम्यान विविध मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर, २२ ते २४ जुलै दरम्यान स्तन कर्करोग तपासणी, २५ ते २७ जुलै दरम्यान गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, २२ ते २४ जुलै दरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी तसेच २२ ते २५ जुलै दरम्यान नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा समावेश आहे. आवश्यक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित मोफत तपासणी व आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अबिद नाईक यांनी केले.