कॉम्प्रेक्स गॅससाठी खाजगी कंपन्यांना लीजवर जमिनी द्या ; गावक-यांनीच आता रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा
कणकवली,दि.०४ ऑगस्ट
पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण पट्ट्यात भाजपा संघटनात्मक जबाबदारी माझ्याजवळ आहे. त्याचबरोबर महायुतीचा संघटक म्हणून पालघर , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांमध्ये काम करत आहे. आता रोजगार निर्माण करण्यासाठी गावागावांतील गावक-यांनी पुढाकार घ्यावा. कॉम्प्रेस गॅस निर्मिती प्रकल्प सहकारातून उभे करुया. आपल्या जमिनी विकू नका तर भाड्याने द्या. किमान 300 एकर एका गावात जमिनीची आवश्यकता आहे. गेल नावाची कंपनी निर्माण झालेला गॅस घ्यायला तयार आहे. तसेच संबंधित प्रकल्पाच्या गुंतवणूकीसाठी काही कंपन्या तयार आहेत. त्यामुळे कोकणातील रोजगारासह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची माहिती विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते,यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , शिवडवणे सरंपच रवींद्र शेटये , पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, भाजपा उपाध्यक्ष श्री. जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेतक-यांनी जमिनी न दिल्यामुळे नाणार प्रकल्प आता दुस-या भागात गेला. औष्णिक प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, लोकांचा विरोध असण्यापेक्षा आम्ही सरकारला सांगितले आहे , पहिल्यांदा जैतापूर प्रकल्प व अन्य ठिकाणी घेतलेल्या जागा आहेत त्याठिकाणी प्रकल्प सुरु करा. आता रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने काही छोटे छोटे प्रकल्प खाजगी विकासकांमार्फत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महास्वराज्य अभियानांतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत काम केल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपण मूळचे सिंधुदुर्गचे असल्याने येथील प्रश्न सोडविण्यात येतील. विधिमंडळाच्या अधिवेशनात कोकणातील विविध प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे अधिक अभ्यासपूर्वक तालिका सभापती म्हणून काम करता आले. पुढील बारा वर्षांत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील , असे प्रमोद जठार यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी महसूल विभागातील क्लिष्ट प्रक्रिया सुलभ करण्याचे काम सुरु आहे. अनेक निर्णय महसुल मंत्री म्हणून मंत्री बावनकुळे यांनी घेतले आहेत. त्यांच्या प्रभावी अभ्यासपूर्ण भाषणांमुळे आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पडली आहे. ७०-ब दाव्यांच्या निकाली काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्याचा प्रयत्न असून ग्रामपंचायत ते मंत्रालय या स्तरावरील प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांबाबत मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगत, आता केवळ प्रश्न मांडण्याऐवजी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची भूमिका महायुती सरकारची आहे. कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिक संधी मिळाव्यात, यासाठी शिक्षक, महसूल आणि इतर विभागांमध्ये ७० ते ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य मिळावे, विभागीय संवर्ग पध्दतीने भरती प्रक्रिया करण्यात यावी , यासाठी संबंधित संघटना आमदारांशी माझी चर्चा झाली आहे. यामुळे कोकणातील रोजगार वाढेल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.
दोडामार्ग येथील तिलारी परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने वनतारा – 2 सारखा प्रकल्प उभारण्याबाबत वनमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच लोटे-परशुराम औद्योगिक परिसरातील प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उद्योजकांशी बैठक घेण्यात आली आहे. उद्योग सुरू राहतील आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे , असे प्रमोद जठार म्हणाले.