14.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
कणकवली ,दि.२० जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या अवैध दारूविरोधात धडक कारवाई करत तब्बल 14 लाख 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 6 लाख 52 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू तसेच 8 लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संदीप शंकर चव्हाण (वय 36, रा. तळेरे-वाघाचीवाडी, ता. कणकवली), तेजस भांबुरे (रा. तळेरे) आणि सागर डंबे (रा. तळेरे) यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 176/26 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई), 81 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल डिसोझा (पोह/417), डिसोझा (पोह/989), घोनसल्विस (पोह/1001), जामदार (पोह/1082) तसेच पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर (1217) यांनी सहभाग घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.