1 जुलैपासून विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू; 29जुलैपर्यंत गणना फॉर्म भरून देण्याचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
कणकवली, दि. ०७ जुलै
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जुलै २०२६ पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक मतदाराला गणना फॉर्म वितरित केला जात आहे. हा फॉर्म २९ जुलै २०२६ पर्यंत भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक असल्याची माहिती तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली.कुटुंबातील एका सदस्याकडे संपूर्ण कुटुंबातील मतदारांचे फॉर्म दिले जाणार असून, वेळेत फॉर्म भरून न दिल्यास संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जातील , अशी सुचना तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
या प्रक्रियेनंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीत नावाबाबत आक्षेप, दुरुस्ती अथवा चुकीने नाव वगळले गेल्याची तक्रार असल्यास ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर सर्व आक्षेप निकाली काढून १० ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ४ तालुकाध्यक्ष आणि २५ बीएलए उपस्थित होते. बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले.
कणकवली तालुक्यातील सर्व १३८ मतदान केंद्रांवरील बीएलओ स्वतः हे कामकाज पार पाडत असून, त्यांच्या मदतीसाठी सहाय्यकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीमार्फत गणना फॉर्मचे वितरण करण्यात येत नाहीत.तसेच, एखाद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बाबत तक्रार असल्यास ती थेट तहसील कार्यालयाकडे लेखी स्वरूपात सादर करावी. अशा तक्रारींवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव कायम राहण्यासाठी निर्धारित मुदतीत गणना फॉर्म भरून देण्याचे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.