हळवल येथे पंचायत समिती सभापतींसह ,सदस्यांच्या सहभागातून वनराई बंधारा
कणकवली,दि.१० ऑक्टोबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी कणकवली पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. वनराई बंधारा बांधणी मोहिमेंतर्गत शनिवार, १० ऑक्टोबर रोजी हळवल येथे कणकवली पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती आणि सदस्यांनी एकत्र येत वनराई बंधारा बांधला. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश देत जलसंधारणाच्या कामात लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य शितल दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, बबलू सावंत, पवन भालेकर, गुरुनाथ वर्देकर, मानसी मराठे, महेश्वरी चव्हाण आणि अक्षता राणे उपस्थित होते. तसेच गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कृषी अधिकारी शशिकांत भरसट, कृषी विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, विशाल शिंदे, हळवल ग्रामपंचायत सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, माजी सरपंच संतोष गुरव, ग्रामपंचायत सदस्य पूर्वा राणे, ग्रामसेवक वर्षा कदम, लवू परब, सागर राणे, अनिल पडावे, हर्षदा सावंत, संदीप राणे, अशोक चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास आणि परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास हातभार लागू शकतो. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी गावागावांत अशा प्रकारचे जलसंधारणाचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.