कणकवली : सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेलमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ..

शेअर करा

अमेरिका इराण युद्धाचे थेट परिणाम दिसू लागले ; पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 90 पैशांनी तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ

कणकवली, दि. २३ मे  

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे. नव्या दरवाढीनुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 90 पैशांनी तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ झाली आहे. सततच्या वाढीमुळे वाहनधारक, प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल पाच रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्याचा परिणाम भाजीपाला, दूध, धान्य तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही दिसून येत आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असून डिझेलही वेगाने महाग होत आहे. रोजच्या प्रवासासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. खासगी वाहतूकदार आणि मालवाहतूक व्यावसायिकांनीही वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचे संकेत दिले आहेत.
इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना आता इंधन दरवाढीचा दुहेरी फटका बसत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणि कररचना यामुळे इंधनाचे दर वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. पुढील काही दिवसांतही दरवाढ सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेअर करा