कणकवली पंचायत समिती जनता दरबार ; जनता दरबारात विविध समस्यांवर झाली चर्चा
कणकवली,दि.१ सप्टेंबर
कणकवली तालुक्यातील विविध समस्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार कणकवली पंचायत समितीचा जनता दरबारात वीज वितरण , सार्वजनिक आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय , बांधकाम विभाग , बीएसएनल यासह विविध विभागांबाबत प्रश्न उपस्थित झाले. यावेळी लोकप्रतिनीधी , नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांमुळे काही समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या जनता दरबारात अक्षरश: वीज वितरण विभागाचे वाभाडे विविध समस्यांमुळे निघाले तर बांधकाम , आरोग्य , बीएसएनल यासह विविध विभाग नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला. मात्र, अधिका-यांनी सकारात्मक उत्तर देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पंचायत समितीचा जनता दरबार सभापती हर्षदा वाळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोगटे , सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे, एसटीचे विभाग नियंत्रक प्रदीप घोडे, बिएसएनएलचे श्री. कुलकर्णी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पूजा काळगे , नरडवे सरपंच बाबू सावंत , पिसेकामते सरपंच सुहास राणे, भिरवंडे सरपंच नितीन सावंत,कळसुली सरपंच सचिन पारधीये , बाळू मेस्त्री, पंचायत समिती सदस्य पवन भालेकर,लक्ष्मण गावडे,राजश्री पवार,गुरुनाथ वर्देकर ,राजेश जाधव, जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी ,संतोष पारकर ,माजी जिल्हापरिषद सदस्य संजय देसाई,वाघेरी सरपंच अनुजा राणे,माजी सरपंच संतोष राणे, ओटव हेमंत परुळेकर उपस्थित होते.
कणकवली जनता दरबारात महावितरणबाबत प्रचंड नाराजीचा उद्रेक मांडलेल्या प्रश्नांमधुन दिसून आला. त्यामध्ये तरेळे येथे सबस्टेशन करावे त्यासाठी खारेपाटन येथुन 11 किलोमीटरची लाईन स्वतंत्र करण्यात यावी, अशी मागणी राजेश जाधव यांनी केली, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी कासार्डे गावात सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होतो. अधिकारी लाईट वरुन गेली असे सांगतात, त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी आवश्यक नव्या लाईन संदर्भात अंदाजपत्रक येत्या 8 दिवसांत बनवले जाईल , असे सांगितले. नरडवे गावातील वीज पोल खराब झालेले आहेत. कळसुली गावातील वीजेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला वायरमन पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. त्याबाबत कासार्डे गावातील वीज सेवेवर परिणाम झाला असल्याचा मुद्दा आल्याने कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी उपकार्यकारी अभियंत्यांनी सर्व कामे त्या महिलांना आली पाहिजेत. कारण 33 टक्के आरक्षणानुसार त्या महिलांची भरती करण्यात आली असून त्यांनी पोलावर चढणे , झाडी कटींग करणे ही सर्व कामे येणे आवश्यक आहे, असे सांगितले.
कनिष्ठ अभियंता श्री.तावडे यांनी ग्रामपंचायत दिगवळे यांनी स्ट्रीट लाईटची पोलवरील झाडीवरील सफाई ग्रामपंचायतने करावी , असे पत्र दिले. त्यावर ग्रामपंचायत सरपंच , लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत अशा पध्दतीने पत्रव्यवहार करायचा अधिकारी कोणी दिला ? असा जाब विचारला असता त्यावेळी सभापती हर्षदा वाळके यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगत अधिकारी कोण आहेत? अशी विचारणा केली त्यावर कार्यकारी अभियंता यांनी असे चुकीचे पत्र देवू नका , अशा सुचना केल्या. तसेच दिगवळे सरपंच यांनी गावात 50 पोल धोकादायक झाले आहेत असे सांगितले. पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे यांनी गावात कायम वीजेचा लपंडाव सुरु आहे अनेक पोल मोडकळीस आले आहेत , हा मुद्दा मांडला त्यावर येत्या 7 दिवसांत संबंधित पोल बदलून लाईट सुरळीत करा , अशी मागणी केली. तसेच उपसभापती सोनु सावंत यांनी आता वागदे सह कलमठ फिडर स्वतंत्र झालेला आहे. त्यामुळे कलमठ फिडरवरुन वरवडे , पिसेकामते या गावांना गणेशोत्सव काळात वीजपुरवठा करा , अशा सुचना केल्या.
हा मुद्दा मांडताना पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे यांच्याबाबत कलमठ कनिष्ठ अभियंता श्री. तिरपुडे यांनी बोलण्याबाबत आक्षेप नोंदवला . त्यामुळे तालुक्यातील सरपंच आक्रमक होत ही भाषा अधिका-याला शोभते का ? असे विचारणा केली. त्याबरोबर वीज वितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी नीट बोलण्याच्या सुचना अधिका-यांनी दिल्या. लोरे नं. 1 येथील अनमल राणे यांनी सतीचा माळ येथे थ्री पेज वीज पुरवठा करा , झाडी कटींग करा अशी मागणी केली. त्यावर हा तालुक्याचा प्रश्न असून तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये गणेश उत्सवात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी येत्या 4 -5 दिवसांत स्थानिक कामगार घेवून झाडी कटींग करावी, अशा सुचना सभापती व उपसभापती यांनी दिल्या. त्यावेळी वीज वितरण कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी झाडी कटींगचा खर्च ताबडतोब दिला जाईल , असे आश्वासन दिले.
त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग यावर चर्चा झाली. त्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 16 डॉक्टर कार्यरत आहेत परंतु, नागरिकांना सेवा मिळत नाहीत . त्यामुळे वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांची हजेरी बायोमॅट्रीक करण्यात यावी. अनेक रुग्णांना प्राथमिक उपचार करुन ओरोस येथे पाठवण्यात येत आहेत आणि तिथुन गोवा बांबूळी या रुग्णालयात पाठवले जाते. मग प्राथमिक आरोग्य केंद्रांसह तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यात यावी. महालॅबकडून देण्यात येणारी रक्त तपासणी सेवा ही घातक ठरत आहेत. चुकीचे रिपोर्ट दिले जात आहेत. यावर डॉ. पाटील डॉ. इंगवले यांनी सेवा सुधारणाबाबत आश्वासन दिले. यावेळी स्त्रीरोगतत्र व रिक्त पदांबाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री कार्यालयाचे प्रमुख श्री. भागले यांनी सांगितले. पुरेसा औषध साठा ग्रामीण भागात उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी करत सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातुन गरोदर मातांना कुडाळ येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते ही बाब भिरवंडे सरपंच नितीन सावंत यांनी लक्षात आणून दिली.
कणकवली तालुक्यातील खड्डे गणेशचतुर्थीपूर्वी भुजवण्यात यावेत , तसेच रस्त्याच्या बाजुला वाढलेली झाडी तोडण्यात यावी, बोर्डवे शाळेसमोर स्पीड ब्रेकर लावण्यात यावा. शिवडणे – शेर्पे रस्त्यावर झाडी वाढलेली आहे. याशिवाय तालुक्यातील बांधकाम विभागातील अनेक प्रश्न लोकप्रतिनीधींनी मांडले. एसटी महामंडळाबाबत तालुक्यातील बसफे-या वेळेत सुटत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक गावातील सरपंचांनी बसफे-या सुरु करण्याची मागणी केली.तसेच वाघेरी येथील गणेशघाट बांधकामाचे बील का अदा करण्यात आले नाही ? जलजीवनचे काम अर्धवट असल्याचे संतोष राणे यांनी सांगितले. नांदगाव येथील राजा म्हसकर ओटव धरणाच्या पाण्याची पाईपलाईन करताना भूसंपादन करण्यात आले नाही. मोठे चर मारून ठेवल्यामुळे 32 शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.दिगवळे येथील बीएसएनएल टॉवरला रेंज नसल्यामुळे तेथील सरपंच संतोष घाडीगांवकर यांनी आक्रमक भूमिका घेत सेवा देत नसाल तर टॉवर काढून घेवून जावे , अशी मागणी केली. त्यावर उपसभापती सोनु सावंत यांनी हा तालुक्यात प्रश्न असून बीएसएलएनच्या अधिका-यांनी चांगली सेवा देवून प्रश्न मार्गी लावावेत अशा सुचना केल्या. या जनता दरबारात बरेचशे प्रश्न लोकप्रतिनीधी व नागरिकांनी मांडले त्यावर काही दिवसांचा कालावधी देत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.