अधिका-यांनी 3 ते 5 या वेळेत नागरिकांशी सुसंवाद साधावा ; नागरिकांच्या निवेदनावर बैठका घेवून तातडीने निपटारा करा
कणकवली,दि.०३ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा स्तरावरील काही विषयांचे निवेदने प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील विविध प्रश्नांचे 135 निवेदने एकाचवेळी मंत्र्यांना आली आहेत, हे जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या आलेल्या निवेदनांचा निपटारा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठका घेवून त्यावर मार्ग काढावा. कायदेशीरदृष्ट्या जे योग्य आहेत, त्याचे निर्णय घ्यावेत. कायद्यात बसत नसेल त्यांना नाही म्हणून कळवावे. यापुढील काळात जिल्ह्यातील अधिका-यांनी नागरिकांशी संवाद वाढवण्याच्या दृष्टीने दुपारी 3 ते 5 यावेळेत नागरिकांशी भेट असे बोर्ड कार्यालयाबाहेर लावावेत, अशा सुचना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
कणकवली येथे महास्वराज्य अभियानात निवेदन स्विकारल्यानंतर त्यांनी अधिका-यांना सुचना दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे , आ. निलेश राणे , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, आ. प्रमोद जठार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
माझ्याकडे 135 निवेदने प्राप्त झाली त्यापैकी 90 टक्के जिल्हा स्तरावर निर्णय होणारी आहेत तर 10 टक्के फक्त मंत्रालय स्तरावरील आहेत. 90 टक्के निवेदनावर निर्णय घ्यावेत.अर्जदारांचे संपूर्ण समाधान करायचे काम करा, त्याचे आदेश पारित करा. जे नियमांच्या बाहेर आहेत, त्यांना नियमात नसल्याचे सांगा. पण ज्या गोष्टी पूर्ण होणा-या आहेत त्यात कोणीही टाळाटाळ करु नका.मी आता जिल्हाधिकारी बैठक घेत नाही, परंतु पुढच्या महिन्यांत जिल्हाधिकारी आढावा बैठका घेण्यासाठी येईन.त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे , आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत फ्रेमवर्क केले जाईल.आ. निलेश राणे यांनी सुचवलेले आकारीपड , वनसंज्ञा, कबुलातदार गावकर यासह विविध 5 विषयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे निर्देश जिल्हाधिका-यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
निर्णय न घेणे ही अधिका-यांची चुक आहे. तात्काळ निर्णय घेवून काही अडचणी वाटत असतील तर माझ्याकडे पाठवा.सर्वात मोठी चुक प्रशासनाची काय आहे ? जरा तुम्ही अजुन लोकाभिमुख काम केलं असतं तर एवढी निवदने आली नसती. तुम्ही जर नागरिकांना 3 ते 5 यावेळेत भेटला असता तर अनेक प्रश्न मार्गी लागले असते. प्रत्येक प्रांताधिकारी , तहसिलदार ,उपअधिक्षक भूमीअभिलेख, मुद्रांक अधिकारी यासह विविध विभागाचे अधिकारी सर्वांच्या केबीन बाहेर 3 ते 5 यावेळेत भेटण्याची वेळ लावण्याची गरज आहे. मंत्र्यांना 135 निवेदने आली आहेत , हे जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले नाही. प्रशासनाने यासाठी काळजी घेतली पाहिजे. पुढच्या 2 महिन्यानंतर आल्यावर या जिल्ह्यातील एकही निवेदन मंत्र्याकडे जावू नये, अशी काळजी घ्या , अशा सक्त सुचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या.
मी पुन्हा दौ-यावर येईन त्यावेळी मी पुन्हा निवेदन घेवून या असे जाहिर करणार आहे. माझा दौराच तसा आहे. सर्व प्रशासकीय अधिका-यांनी काळजी घ्यावी. नागरिकांमध्ये जावून जिल्हा , तालुका स्तरावरील अधिका-यांनी काम करावे. नाशिक जिल्हाधिका-यांनी जशा पध्दतीने पॅटर्न तयार केला आहे , त्याची अंमलबजावणी करा. प्रवास आणि संवाद मंत्री म्हणून मी करतो आहे तर प्रशासनाची पहिली जबाबदारी आहे.त्यामुळे पुढच्या वेळी मला कमीत कमी निवेदने मला आली पाहिजेत. 135 निवेदना येणं ही प्रशासनाची चांगली लक्षणे नसल्याचे प्रशासनाला मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.