महायुती सरकारचा विश्वास; शेतकरी हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही
कणकवली,दि.१६ जुलै
खासदार नारायण राणे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सहअध्यक्षपदी संदीप साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या विश्वासासाठी खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे तसेच महायुती सरकारच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार,” असे ते म्हणाले.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन, शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून काम करणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला ही जबाबदारी मिळाल्याने परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधान आणि नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.