कणकवली : हळवल फाट्यावरील अपघाताचे सत्र सुरुच कंटेनर पलटी होवून दोघेजण जखमी

शेअर करा


कणकवली ,दि.२५ जून

मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील वळणावर मंगळवारी रात्री सुमारे ८.२२ वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारा दहा चाकी कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कंटेनरमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.

याबाबत वृत्त असे की, अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गावरील वळणावर कंटेनर पलटी झाल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यास सहकार्य केले. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावर आडवा पडल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

हळवल फाटा वळणावर हायमास्टची मागणी

मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील वळणावर वारंवार अपघात होत आहेत. हायमास्ट दिवा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या कंटेनर अपघातानंतर ही मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, धोकादायक वळण आणि वाढती वाहतूक यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात दृश्यमानता कमी होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हायमास्ट उभारून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शेअर करा