पर्यटन व्यावसायिक, युथ बिट्स फॉर क्लायमेट, कांदळवन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पक्ष्याची सुटका व उपचार!
मालवण,दि.२९ ऑक्टोंबर
निवती लाईटहाऊस येथील समुद्रात दुखापतग्रस्त स्थितीत सापडलेल्या ‘ग्रेटर क्रेस्टेड टर्न’ या समुद्री पक्षाला पर्यटन व्यावसायिक, युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था, कांदळवन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्यातून सुखरूप बचाव व उपचार करून त्याला जीवदान देण्यात आले.
निवती लाईटहाऊस येथील समुद्रात देवबाग येथील बोट मास्टर सुशांत राणे व महेंद्र येरागी यांनी पर्यटकांना समुद्र सफरसाठी नेले असता त्यांना एक ‘ग्रेटर क्रेस्टेड टर्न’ हा समुद्री पक्षी समुद्राच्या पाण्यात दुखापत ग्रस्त होऊन पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या पक्षास लगेच रेस्क्यू करून देवबाग किनाऱ्यावर आणले व युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला. संस्थेने याची माहिती
कांदळवन विभागास दिली. कांदळवन विभागाचे मालवण वनपाल सत्यवान सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राणे व श्री. येरागी यांनी तो पक्षी कांदळवन विभागाच्या कार्यालयामध्ये सुपूर्द केला. या समुद्री पक्षावर मालवण तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सुधीर कानसे यांनी उपचार केले असून त्याची स्थिती स्थिरावली आहे अशी त्यांनी माहिती दिली.
क्रेस्टेड टर्न हा एक मोठा, किनारपट्टीवर आढळणारा टर्न पक्षी आहे, ज्याची चोच पिवळी असते आणि डोक्यावर काळा तुरा असतो. त्याच्या शरीराचा वरचा भाग, पांढऱ्या मानेसह, बहुतेक गडद राखाडी आणि पांढरा असतो. उडताना त्यांचे पंख लांब असतात आणि त्यांचा पुढचा भाग जड असतो (त्यांच्या मोठ्या चोचीमुळे आणि लांब मानेमुळे कधीकधी त्यांना गॅनेट समजून गैरसमज होतो). टर्न हे गल पक्ष्यांशी संबंधित आहेत, परंतु त्यांची चोच अधिक सरळ आणि टोकदार असते, तसेच त्यांचे पंख अधिक बारीक असतात. त्यांची शेपटी दुभंगलेली असते आणि त्यांची उडण्याची पद्धत मोहक असते, ज्यामुळे त्यांना पूर्वी ‘सी-स्वॉलो’ (समुद्री पाकोळ्या) हे नाव मिळाले होते. सरासरी आकार ४७ सेंमी आणि सरासरी वजन ३२२ ग्रॅम असते. हे पक्षी सहसा थव्यांमध्ये दिसतात. ते किनाऱ्यापासून दूर असलेल्या लहान बेटांवर वसाहती करून प्रजनन करतात, जिथे त्यांची घरटी इतकी दाटीवाटीने बांधलेली असतात की शेजारील घरट्यांचे मालक एकमेकांच्या चोचींना स्पर्श करू शकतात. ते तरंगत्या फ्लोट्स किंवा खडकांवर आणि वाळूच्या बेटांवर, अनेकदा इतर टर्न आणि गल पक्ष्यांसोबत विश्रांती घेतात, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने दिले.