Vengurla News :भोगवेत ५ रोजी सिंधुदुर्ग शाश्वत विकासावर चर्चासत्राचे आयोजन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.२९ ऑक्टोंबर

सिंधुदुर्गचा आर्थिक विकास, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्या पुढाकाराने भोगवे येथील ‘द लीला’ज बांबू हाऊस अॅण्ड वॉटर स्पोर्टस रिसॉर्टस’ येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. ‘सिंधुदुर्ग शाश्वत विकास’ या विषयावर सकारात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
भुईबावडा येथील प्रमोद प्रभुलकर यांना सिंधुदुर्गच्या विकासाची तळमळ आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शेतकरी, पर्यटन व्यावसायिक, उद्योजक व नागरिक यांच्यात समन्वय साधून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
चर्चासत्रात लेखक, दिग्दर्शक, सिंधुदुर्ग शाश्वत विकास उपक्रमाचे आयोजक प्रमोद प्रभुलकर, विजय जाधव, ‘द लीला’ज बांबू हाऊस अॅण्ड वॉटर स्पोर्टस रिसॉर्टस’, भोगवेचे महेश सांमत, MACHALI Farmstay, वेंगुर्लाचे प्रथमेश सामंत, कोकण कॅलिंगचे डॉ. पूजा डांगी, प्रवीण रेपे, एमसीईडीचे संचालक राजेश कांदळगावकर, RSETI, कुडाळचे किशोर रोडी, समीर सावंत, संगीतकार प्रणय शेटे, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. धनश्री पाटील, तन्वी चव्हाण, दीपक पावले, रवींद्र काळे, सुनील भोसले, प्रसाद मेस्त्री, दिलीप परब, किशोर सरनोबत आदी सहभागी होणार आहेत. कृषी पर्यटन, स्थानिक उद्योग, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन, डिजिटल प्रचार, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासावर चर्चा होणार आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस कृती आराखडा व परस्पर सहकार्याच्या संधी निश्चित करण्याचा किंवा संघर्षाऐवजी सकारात्मक प्रयत्न करण्यात येणार आहे. टीका संवाद, सहकार्य आणि कृतीच्या माध्यमातून सिंधुदुर्गला विकासाच्या जागतिक नकाशावर आणणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे. चर्चेतून पुढील काळात प्रत्यक्ष कामाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली असून सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग शाश्वत विकासचे संस्थापक प्रमोद प्रभुलकर यांनी केले आहे.

शेअर करा