Ratnagiri : भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी रत्नागिरीत “पाणी परिषद” संपन्न

शेअर करा

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; जलसंधारण, पाणी नियोजनावर भर

रत्नागिरी ,दि.२९ ऑक्टोंबर

भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ उत्साहात संपन्न झाली. या परिषदेला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भविष्यातील पाणी टंचाई, पाणी नियोजन’ हा परिषदेचा प्रमुख विषय होता.

पाणी ही भविष्यातील सर्वात महत्त्वाची गरज असून, वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, पावसाच्या स्वरूपातील बदल आणि उपलब्ध जलस्रोतांवरील वाढता ताण या पार्श्वभूमीवर पाण्याचे शाश्वत नियोजन करण्याची आवश्यकता परिषदेत अधोरेखित करण्यात आली.

यावेळी जलसंधारणाची कामे, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळी वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

आमदार प्रमोद जठार यांनी परिषदेला उपस्थित राहून जलप्रश्नाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. प्रशासन, जलक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास जलसंधारणाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देता येईल, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या परिषदेमुळे ‘पाणी वाचवा, पाणी जपवा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित ठेवा’ या संदेशाला व्यापक स्वरूप मिळाले.

शेअर करा