ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांचे गौरवोद्गार; मानवी नातेसंबंधांचे मर्मभेदी चित्रण करणाऱ्या कथांचे कौतुक!
वेंगुर्ला,दि.२९ ऑक्टोंबर
आपल्या आजूबाजूची माणसं, त्यांची बदलती रूपं आणि काळाच्या ओघात बदलत जाणारे नातेसंबंध यांचे मर्मभेदी चित्रण प्राजक्ता आपटे यांच्या ‘मुकी मैत्रीण’ या कथासंग्रहात पाहायला मिळते. हा त्यांचा पहिलाच प्रकाशित कथासंग्रह असला, तरी त्यात कुठेही बाळबोधपणा जाणवत नाही. अलंकारिक शब्दांचा मारा न करता ओघवत्या भाषेत आणि उत्तम कथाबीजांच्या आधारे साकारलेल्या या कथा प्रत्येक वाचनात नवे पैलू उलगडून वाचकाला थक्क करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा २०२६-२७ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला शाळा क्र. २ च्या मुख्याध्यापिका प्राजक्ता प्रशांत आपटे यांच्या ‘मुकी मैत्रीण’ या पहिल्याच कथासंग्रहाचे प्रकाशन २५ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रघुवीर मंत्री, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, चित्रकार सुनील नांदोसकर, लेखिका प्राजक्ता आपटे आणि साप्ताहिक ‘किरात’च्या संपादक सीमा मराठे उपस्थित होते.
कोकणातील निसर्गाचे सौंदर्य प्राजक्ता आपटे यांच्या लेखणीतून कथांच्या रूपाने उतरले असल्याचे सांगत वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक नगरवाचनालयात हे पुस्तक पोहोचावे, या हेतूने रघुवीर मंत्री यांनी प्राजक्ता आपटे यांना २५ हजार रुपयांची देणगी दिली. लेखिका प्राजक्ता आपटे यांनी आपल्या मनोगतातून लेखनप्रवासातील आठवणींना उजाळा देताना आई-वडील आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे लेखनप्रवासाला बळ मिळाल्याचे सांगितले. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ साकारलेले चित्रकार सुनील नांदोसकर यांनी मुखपृष्ठनिर्मितीमागील विचार स्पष्ट केलाज्या शिक्षकांचा सहवास मुलांना आवडतो आणि ज्यांच्याभोवती मुले आनंदाने वावरतात, ते शिक्षक उत्तम असतात, असे निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी सांगत आपण शाळांना भेटी देत असताना प्राजक्ता आपटे यांच्याभोवती मुलांचा असाच घोळका पाहिल्याची आठवणही सांगितली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्राजक्ता आपटे यांच्या हातून अशीच नवनवीन पुस्तके लिहिली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा मराठे यांनी केले. निवेदन शशांक मराठे यांनी केले, तर नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आभार मानले.
किरात ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राजकारण, उद्योग, साहित्य, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.